बसमधून उतरताना दागिन्यांची पर्स लांबवली

| पनवेल | वार्ताहर |

अलिबाग ते पनवेल बसमधून पनवेल बस थांब्यावर उतरत असताना 55 वर्षीय महिलेकडील लहान पर्समध्ये ठेवलेले दागिने चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कल्पना महेंद्र पाटील ह्या वडवली, ताडवागळे येथे राहतात. त्या पोयनाड बस थांबा येथून अलिबाग ते पनवेल बसने ठाणगेवाडी, कल्याण येथे जात होत्या. सदरची बस पावणेचार वाजता पनवेल बस स्टॉप येथे थांबली. यावेळी प्रवाशांची गर्दी होती. त्या खाली उतरून पनवेल येथील बिकानेर स्वीट मार्ट येथे खाऊ घेत असताना पैसे काढू लागल्या. यावेळी त्यांना मोठ्या पर्समधील सोन्याचे दागिने ठेवलेली सफेद रंगाची लहान पर्स दिसून आली नाही. यावेळी पर्स आतमध्ये असेल म्हणून त्यांनी शोधाशोध केली नाही. त्यानंतर त्या बहिणीकडे गेले असता त्यांनी पर्स तपासून पाहिली. यावेळी लहान पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने सापडून आले नाहीत. पनवेल बस स्टॉप येथे उतरताना चोराने सहा लाख तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

Exit mobile version