पांढरा कांदा लागवडीला सुरुवात; शेतकर्यांची लगबग सुरू
। अलिबाग । प्रतिनिधी ।
औषधी व चविष्ट म्हणून अलिबागच्या पांढर्या कांद्याकडे पाहिले जाते. त्याला शेतकर्यांचा पांढरं सोनंही म्हटले जाते. रुचकर चव आणि औषणी गुणधर्मामुळे पांढरा कांदा नावारुपाला आला आहे. त्यामुळे स्थानिक बाजारासह राज्यासह व अन्य देशातही कांद्याला प्रचंड मागणी आहे. अलिबागमधील कार्ले, खंडाळे, परिसरातील असंख्य शेतकरी पांढर्या कांद्याची लागवड करण्याच्या कामाला लागू लागले आहेत. लागवड करण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शेकडो हातांना आता काम मिळू लागले आहे.
अलिबागमधील पांढरा कांद्याला पर्यटकांकडूनदेखील पसंती दर्शविली जाते. अलिबागला फिरायला आल्यावर अलिबागचा पांढरा कांदा विकत घेण्यावर पर्यटक अधिक भर देतात. अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, नेहुली, वाडगाव अशा अनेक गावांतील शेतकरी पांढर्या कांद्याची लागवड करतात. दोन-अडीच महिन्यात कांदा तयार झाल्यावर काढणी करून तो सुकविणे, त्याच्या माळी तयार करणे, त्यानंतर तो बाजारात विक्रीसाठी पाठविणे ही प्रक्रिया केली जाते. या कांद्याच्या लागवडीमधून लाखो रुपयांची उलाढाल होते. ही कामे करण्यासाठी स्थानिक महिलांच्या हाताला काम मिळते. रोजगाराचे साधन या कालावधीत सुरू होते.
यंदा अलिबागच्या पांढर्या कांद्याची लागवड करण्यास गेल्या आठ दिवसांपासून सुरूवात झाली आहे. सुमारे 275 हेक्टर क्षेत्रामध्ये ही लागवड करण्यात आली आहे. कांदा उत्पादक शेतकरी कांदा लागवडीच्या कामाला लागले आहेत. आळी तयार करणे, त्यामध्ये कांद्याच्या रोपांची लागवड करण्याचे काम सुरु झाले आहे. वाफे पद्धतीने लागवडीवर शेतकर्यांनी अधिक भर दिल्याचे चित्र आहे. दोन महिन्यांनंतर कांदा तयार होऊन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कांदा बाजारात जाण्याची शक्यता आहे.
मानांकन प्राप्त कांदा
अलिबागच्या कांद्याला मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे या पांढर्या कांद्याची एक वेगळी ओळखी निर्माण झाली असून, स्थानिकांसह देशभरात येणार्या पर्यटकांकडूनही मागणीत वाढ होत आहे. वाढत्या मागणीमुळे शेतकरीसुद्धा कांद्याचे अधिकाधिक उत्पादन मिळावे यासाठी मेहनत घेत आहे. सध्या कांदा लागवड करण्यात शेतकरी गुंतला आहे.
Related