कर्जत तालुक्यातील पहिलाच प्रयोग; कृषी विभागाचे मार्गदर्शन
| नेरळ | संतोष पेरणे |
अलिबागचा पांढरा कांदा विशेष गुणकारी म्हणून प्रसिद्ध असून, अलिबाग तालुक्यातील या कांद्याला विशेष मागणी असते. या कांद्याची लागवड नेरळजवळील कुंभे गावातील शेतकरी अंकुश गणपत शेळके यांनी लागवड केली आहे. कर्जत तालुक्यातील पांढर्या कांद्याचा हा पहिलाच प्रयोग असून, कृषी विभागाकडून शेतकर्यांना विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. दरम्यान, शेतकरी शेळके यांना अलिबाग, चोंढी येथील प्रगत शेतकर्यांदेखील मार्गदर्शन मिळत आहे.
नेरळ ग्रामपंचायतीमध्ये प्रभारी सरपंच आणि उपसरपंच म्हणून काम करणारे अंकुश शेळके यांची उल्हास नदीच्या तीरावर कुंभे येथे शेतजमीन आहे. त्या जमिनीत ते गेली अनेक वर्षे मोगरा फुलाची शेती करतात. त्याचवेळी अन्य काळात वेगवेगळी नगदी पिके घेणारे हे शेतकरी हिवाळ्यात कडधान्य तसेच पावसाळी भाताची शेतीदेखील करीत असतात.शेतीची आवड असल्याने अंकुश शेळके यांनी यावर्षी अलिबाग येथील पांढरा कांद्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अर्धा एकर क्षेत्रात भाताची शेती करून झाल्यावर वाफे तयार करून ठेवले. तृणनाशकांची फवारणी करून झाल्यावर कृषी विभगाचे कशेळे मंडळ अधिकारी विकास गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदा लागवड करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी अलिबाग येथील पांढर्या कांद्याचे बियाणे खास मागवून घेण्यात आले. अलिबागजवळील चोंढी येथील प्रगत शेतकरी रमेश चिंबुलकर यांच्याकडून बियाणे आणण्यात आले. त्या बियाणांची लागवड 22 डिसेंबर 2022 रोजी दोन दिवसांत उरकण्यात आली आणि अवघ्या महिन्यात त्यांच्या शेतात कांद्याची शेती फुलली आहे.
कांद्याच्या शेतीला पाण्याचे नियोजन महत्त्वाचे असते आणि प्रगत शेतकरी असलेले अंकुश शेळके यांनी योग्य नियोजन केले असून, पुढील दीड महिन्यात कांद्याचे पीक हातात येणार आहे. त्यासाठी त्या पिकाची पाहणी करण्यासाठी कर्जत कृषी विभाग मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक यांचे जातीने लक्ष असते. तर कर्जत तालुक्यात यावर्षी प्रथमच पांढर्या कांद्याची शेती केली असल्याने परिसरातील शेतकर्यांनी ती शेती पाहावी आणि त्यातून प्रेरणा घ्यावी यासाठी स्थानिक शेतकर्यांचे अभ्यास दौरे आयोजित केले जात आहेत. कृषी विभागाचे खालापूर विभागीय अधिकारी हेदेखील या आठवड्यात भेट देणार असून, पांढर्या कांद्याच्या शेतीची सक्सेस स्टोरी करण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून सुरू आहे. तर, येणार्या शेतकर्यांना अंकुश शेळके यांच्याकडून माहिती देण्यात येत आहे. अलिबागप्रमाणे कर्जत तालुक्यात देखील पांढर्या कांद्याची लागवड होऊ शकते आणि चांगले पीक येऊ शकते, असा प्रयत्न यशस्वी होत असल्याने शेतकरी शेळके खुश आहेत.
भौगोलिक मानांकन
कोकण कृषी विद्यापीठाने मागील तीन वर्षे सातत्याने अलिबागच्या पांढर्या कांद्याला राज्यातील सर्व जिल्ह्यात लागवड करून पीक घेता यावे यासाठी प्रयत्न झाले होते. त्यावेळी राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पांढर्या कांद्याची शेती कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून केली गेली होती. गतवर्षी राज्यात पांढर्या कांद्याचे पीक यशस्वीपणे घेण्यात आले होते आणि त्यामुळे पांढर्या कांद्याला भौगोलिक मानांकनदेखील मिळाले आहे. त्यामुळे कुंभे येथील शेतकरी अंकुश शेळके यांच्यासारखी अनेक शेतकर्यांनी पांढर्या कांद्याची शेती करावी यासाठी विद्यापीठदेखील प्रोत्साहन देत असल्याचे कर्जत येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्राचे सह शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी सांगितले आहे.
गुणकारी पांढरा कांदा
चवीने तिखट असलेला पांढरा कांदा हा औषधी आणि गुणकारी समजला जातो. त्यामुळे पांढर्या कांद्याला विशेष मागणी असते.