मोरा बंदरातील डिझेल तस्करीला अभय कोणाचे?

दिनेश-वाल्मिकींच्या नावाची चर्चा; चौकशीची मागणी

| उरण | प्रतिनिधी |

मोरा बंदरातून गेल्या अनेक वर्षांपासून समुद्रमार्गे डिझेलची कथित तस्करी सुरू असल्याची चर्चा असूनही संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याने या तस्करांना अभय नेमके कोणाचे? असा सवाल उरणकरांकडून उपस्थित केला जात आहे.

मोठ्या जहाजांमधून डिझेल घेऊन त्याची उरण परिसरात अनधिकृत विक्री केली जात असल्याची चर्चा आहे. या व्यवहारातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. या कथित व्यवसायामागे दिनेश आणि वाल्मिकी यांची नावे असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या चर्चेची सत्यता तपासण्यासाठी संबंधित व्यक्तींसह संपूर्ण डिझेल व्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची चर्चा असताना शासकीय यंत्रणांना याची माहिती नाही का? की ‌‘अर्थपूर्ण‌’ मौनामुळे तस्करीला मोकळे रान मिळाले आहे? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

मोरा बंदर हा संवेदनशील सागरी परिसर असल्याने इंधनाची अनधिकृत हाताळणी व विक्री होत असेल तर शासनाचा महसूल आणि सागरी सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलीस, सीमाशुल्क, बंदर प्रशासन आणि संबंधित विभागांनी संयुक्त तपास करून डिझेलचा स्रोत, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीची संपूर्ण साखळी तपासावी. दिनेश आणि वाल्मिकी यांच्या नावाची चर्चा खरी की खोटी, हे चौकशीतून स्पष्ट करा, अशी मागणी होत आहे. आरोप खरे ठरल्यास कायद्यानुसार कारवाई करावी आणि निराधार असल्यास तेही जनतेसमोर स्पष्ट करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वर्षानुवर्षे तस्करीची चर्चा सुरू असताना प्रशासन झोपले आहे का? आता कागदी कारवाई नको; प्रत्यक्ष चौकशी करून मोरा बंदरातील डिझेलच्या कथित काळ्या धंद्याचा पर्दाफाश करा, अशी जोरदार मागणी उरणकरांकडून होत आहे.

Exit mobile version