पालीचा पहिला नगराध्यक्ष कोण?

विकासकामांच्या जोरावर मारणार बाजी; उत्सुकता शिगेला
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पालीत सर्वत्र नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सध्यस्थीतीत येथील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच राजकीय पक्ष आपली सर्वशक्ती व अक्कल हुशारी पणाला लावून रणमैदानात उतरले आहेत. विकासकामांच्या जोरावर कोणता पक्ष बाजी मारणार हे थोड्याच दिवसात कळणार आहे. या निवडणुकीत शेकाप राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना, भाजप, काँग्रेस, रिपाई, मनसे आदी पक्ष उतरले आहेत. सुधागड तालुक्यातील राजकीय, सामाजिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जाणार्‍या पाली नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. निवडणुकीच्या प्रसार प्रचार प्रक्रियेत आजी माजी आमदार, खासदार, मंत्रीगण सहभागी झाल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. पालीतील प्रथमच होत असलेल्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. येथील 17 प्रभागात विविध पक्षाचे उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. नातीगोती , मित्रपरिवार, कौटुंबिक सबंध आता कामी येणार आहेत. ताई, माई, आक्का विचार करा पक्का, आपल्याच बटनावर मारा शिक्का, विरोधकाला द्या धक्का चे नारे सर्वत्र घुमू लागले आहेत.

पालीचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान कुणाला मिळणार? नगरसेवक म्हणून कोण गुलाल उधळणार ? याचा अंदाज आता लावणे कठीण असले तरी जुने जाणते ज्येष्ठ व राजकीय विश्‍लेषक आपापल्या परीने नाक्यांनाक्यावर अंदाज बांधत आहेत. दरम्यान पालीत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून शेवटी अखेर जो जिता वही सिकंदर म्हणत पालिकरांना आपल्या विकासासाठी लोकशाही पद्धतीने विजयी झालेल्या उमेदवारांचे खुल्या मनाने अभिनंदन करून पालीच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा बाळगणे व वचननाम्यातील कामांची पूर्तता करून घेणे हे जबाबदारीचे काम करावे लागणार आहे.

Exit mobile version