संजय राऊत यांचा सवाल
। मुंबई । प्रतिनिधी ।
सरकार जनतेने निवडून दिलेले आहे. जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे. जनतेच्या भावनेतून हे सरकार आले असे देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे सांगतात. मात्र, डोंबिवलीतील 65 इमारतींवर बुलडोझर चालवला जाणार असून साडे सहा ते सात हजार कुटुंब बेघर झाली. याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी, उपनिबंधक कार्यालयातील सडकी यंत्रणा आणि बोगस बिल्डरांच्या ‘महायुती’मुळे कल्याण, डोंबिवलीतील तब्बल साडेसहा हजार रहिवासी बेघर होऊन त्यांचे संसार रस्त्यावर येणार आहेत. यावर राऊत यांनी परखड शब्दात भाष्य करत महायुती सरकारवर ताशेरे ओढले.
संजय राऊत म्हणाले की, साडेसहा हजार कुटुंबाची फसवणूक झाली. बिल्डरने खोटी कागदपत्र तयार केली. बिल्डर जेव्हा बनावट कागदपत्र तयार करतो तेव्हा त्याला राजकीय आश्रय, राजकीय पाठबळ असते. त्याने शासकीय यंत्रणा विकत घेतलेली असते. म्हणूनच तो एवढ्या उंच इमारती तयार करतो आणि सामान्य मध्यमवर्गीयांना विकतो. तसेच, त्या घरांवर लोकांना कर्जही मिळालेली आहेत. ही साडे सहा हजार कुटुंब एका क्षणात रस्त्यावर येणार आहेत याची सरकारला लाज वाटत नाही का, वेदना होत नाही का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
गौतम अदानीच्या प्रकल्पासाठी जेवढी मेहतन करताहेत तेवढी मेहनत भाजप सरकारने डोंबिवलीतील साडेसहा हजार लोकांसाठी घेतली असती तर ती उद्ध्वस्त झाली नसती. तुम्ही मस्साजोगच्या सरपंचाचा विषय घेता. त्यांना ठार मारण्यात आले. मात्र, दुसरीकडे साडेसहा हजार लोकांना बुलडोझर खाली चिरडून मारले आहे. दोन्ही ठिकाणी मरणच आहे. या प्रकरणामध्ये कोण राजीनामा देणार? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
ही कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे. रस्त्यावर आली आहेत. मग रवींद्र चव्हाण आणि त्या भागातील सत्ताधारी मंत्र्यांचा राजीनामा घ्या. त्या जिल्ह्याचे अनेक वर्ष पालकमंत्री कोण आहेत? खासदार कोण आहेत? ते राजीनामा देणार आहेत का? या साडे सहा हजार लोकांचे भवितव्य काय? लोक आमच्याकडे येतात. परंतु, आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर सरकारी कामात किंवा न्यायालयाच्या कामात हस्तक्षेप करता म्हणून आमच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल कराल.
– खा. संजय राऊत, शिवसेना (उद्धव ठाकरे)