अलिबाग किनार्‍यावरील बंधार्‍याचे काम का रखडले: आ. जयंत पाटील

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग समुद्रकिनारी उभारण्यात येणार्‍या बंधार्‍याचे काम रखडले असून, स्थानिक आमदारांच्या कामचुकारपणामुळे आणि बंदर दुर्लक्षामुळे प्रलंबित राहिले असल्याचा आरोप शेकाप आ. जयंत पाटील यांनी केला आहे. विधिमंडळ अधिवेशनात सभागृहात लेखी प्रश्‍नाच्या माध्यमातून पाटील बंधार्‍याच्या कामाचा मुद्दा उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधले. याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे या रखडलेल्या बंधार्‍याच्या कामावरुन अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

अलिबाग येथील समुद्रकिनारी कोळीवाडा ते जिल्हा पोलीस अधीक्षक बंगला या 200 मीटर बायच्या बांधकामासाठी सरकारकडून चार कोटी रुपये मंजूर आले आहेत. हे काम 22 ऑक्टोबर 2012 रोजीपर्यंत एम.सी. नाटंट या ठेकेदार कंपनीने पूर्ण करून द्यायचे होते; परंतु मुदत असतानाही बंधार्‍याचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. बंधार्‍याचे काम न झाल्याने पावसाळी हंगामात समुद्राच्या भरतीचे पाणी किनार्‍यावर येऊन ते परिसरातील नागरी वस्तीत शिरुन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शिवाय, सध्या जो बंधारा आहे, तो लाटांनी आणि वादळांनी पूर्णपणे तुटला असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बंधार्‍याच्या कामासाठी सरकारने 4 कोटी नऊ लाख 59 हजार 703.68 एवढा निधी मंजूर केलेला आहे. मात्र, स्थानिक आमदारांच्या कामचुकारपणाने आणि बंदर दुर्लक्षामुळे बंधार्‍याचे काम प्रलंबित राहिल्याबद्दल आ. जयंत पाटील तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत बंधार्‍याचे बांधकाम विहित मुदतीत पूर्ण न करणार्‍या ठेकेदारावर कारवाई केली जावी, अशी मागणी करतानाच तसेच बंधार्‍याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने शासनाने कार्यवाही करावी, अशी सूचनाही आ. जयंत पाटील यांनी केली आहे. या लेखी प्रश्‍नांवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बंधार्‍याचे काम रखडले असल्याचे मान्य केले. या बंधार्‍याच्या कामास 14 मार्च 2023 रोजी पर्यावरण विभागाची परवानगी मिळाली असल्याचेही त्यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.

Exit mobile version