गवतफुलांचा फुलोरा खुणावतोय
माणगांव | सलीम शेख |
आषाढातील मुसळधार पावसाने सारी धरित्री आता हिरवीगार झाली आहे.यामधून आता रानफुलंही चांगलीच बहरुन आल्यानं सारा परिसरही विविधरंगी फुलांनी फुलला आहे.त्यामधून डोकावणार्या गवतफुलांचा फुलोराही आता निसर्गप्रेमींना खुणावू लागला आहे.
पावसाळ्याचा दिवसात रानफुलांना बहर आला असून माळरानावर गवत फुलांचा सडा पसरला आहे. संततधार पडणारा पाऊस ,पावसाळ्यातील आल्हाददायक गारवा यामुळे रायगड जिल्ह्यातील माळराने विविध फुलांनी बहरली आहेत. निसर्ग आणि पर्यावरणाच्या विविधतेने रायगड जिल्ह्यातील जंगल समृद्ध आहे. विविध प्रकारच्या वनस्पती ,लतावेलीनी घनदाट असलेले जंगल पावसाळ्यात हिरव्या, पिवळ्या, लाल,गुलाबी रंगांनी भरून गेले आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर तालुक्यातील माळरानात ,डोंगरावर विविध प्रकारच्या फुल वनस्पती उगवतात.काही वनस्पती लगेच फुलतात तर काही परतीच्या पावसात फुलून येतात. या वर्षी धुवांधार पावसाने सर्व मालरान झोडपून काढले होते. त्यामुळे वेलींना बहर येण्यास उशीर झाला.मात्र गेल्या काही दिवसात योग्य वातावरण मिळत असल्याने रान फुलांचा बहर सुरू झाला आहे.
साधारणतःआषाढ, श्रावण ,भाद्रपद महिन्यात विविध रानफुलांना बहर येतो.याच काळात विविध धार्मिक सण असतात.या सणात धार्मिक विधी साठी याच फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तेरडा ,रानभेंडी ,सोनकी, रानआलं, गेंद, मोतीया व कवाली अग्निफुलें इत्यादी फुले मुबलक प्रमाणात माळरानावर बहरत असून अतिशय विहंगम असे दृश्य माळरानावर दिसत आहेत.
पिवळे, हिरवे ,लाल ,केशरी,निळे असे अनेक रंग मालरानावर व झाडी झुडुपात दिसून येत आहेत.यातील काही फुले एक ते दोन दिवस बहरून येतात तर काही कित्येक दिवस ताजी आणि टवटवीत दिसतात. पर्यटक निसर्गप्रेमींसाठी ही पर्वणी असून अनेक हौशी निसर्गप्रेमी या माऴरानावर भेटी देत आहेत. रायगड जिल्ह्यातील जंगलात बहरलेला हा निसर्ग ठेवा आपापल्या कॅमेर्यात टिपून घेण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी मालरानाना आवर्जून भेटी देत आहेत.
पन्नास,साठ फुलांच्या जाती
पान कुसुम (फॉरेस्ट स्पायडर लीली) खाजकांदे ,सुवासिक सफेद मूसली, कर्णफुल, फोंडशी, रान हळद, सीतेची वेणी, अंजनी ,भारंगी, कुड्याची फुले कर्टुल्याची फुले , रान दोडगा, शेरवड इत्यादी फुले माळरानात बहरत आहेत.साधारणतः 50 ते 60 प्रकारची विविध फुले माळरानावर बहरली आहेत.
माळरानावर विविध गवतफुले, रानफुले बहरली आहेत. या फुलांनी माळरानावर सुंदरता आणली आहे. कोकणात रानफुलांचा पावसाळ्यातील बहर हा मोठा ठेवा आहे. विविध रंगाची ही फुले आकर्षक आहेत.अतिशय निसर्ग संपन्न या जंगलांचे संवर्धन व्हावयास हवे.या फुलांचा अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे.
विलास देगावकर, निसर्गप्रेमी.
पावसाळ्यात माळरानावर उगवणार्या वनस्पती व विविध रंगांची फुले ही निसर्गाची किमया आहे.विविध आकार प्रकाराची ही फुले आकर्षक असून निसर्गाची शोभा वाढविणारी आहेत.या फुलांचे आयुष्य काही तास ते काही दिवसांचे असते.विशिष्ठ हवामानात ही फुले फुलून येत असल्याने निसर्ग प्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे.
हेमंत बारटक्के ,निसर्गप्रेमी, साहित्यिक.