| पनवेल | प्रतिनिधी |
ऐन उन्हाळ्यात हवाहवासा वाटणाराआणि लांबून पाहूनच तोंडाला पाणी सुटेल इतका चविष्ट असणारा रानमेवा सध्या पनवेल परिसरातील बाजारात दाखल झाला आहे. छोटा आवळा, बोरे, तोतापुरी कैरी, जांभूळ, करवंद, ताडगोळे, फणस गरे, पिवळा रानमेवा असा रानमेवा भरलेल्या टोपल्या पनवेल परिसरातील ठिकठिकाणी नजरेस पडत आहेत. यातील ताडगोळे, करवंदे, जांभूळ, पिवळा रानमेवा यांना सध्या जास्त मागणी असल्याने त्यांचे भावही दरवर्षीप्रमाणे चढेच असल्याचे रानमेवा विक्रेत्यांकडून सांगितले जाते.
पनवेल परिसरातील रस्त्याच्या कडेला, गावागावातील बाजारात विकण्यासाठी आलेला आंबट, गोड, तुरट रानमेवा खाण्यासाठी पनवेलकरांची झुंबड उडत आहे. उन्हाळा म्हटल्यावर नारळ, आंबा, फणस या पलिकडचा रानमेवा कुणाला दिसत नाही. पण बोरे, रानजांभळे, आवळा, चिंच, पिवळा रानमेवा, ताडगोळे, करवंदे या अस्सल मेव्याने पनवेल येथील बाजारात हजेरी लावल्याने बाजारात घमघमाट सुटत असल्याचे चित्र दिसत आहे. या रानमेव्यातील प्रत्येक फळाचे स्वतःचे वेगळे वैशिष्टयही आहे. रानमेवा गुणकारी असण्यासह त्याची चवही मनाला तृप्त करणारी आहे. त्यामुळे इतरवेळी जंकफूड, चाट पदार्थावर ताव मारणारी तरुणाई बाजारात आलेला रानमेवा आवडीने खात असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. 20 ते 50 रुपयांमध्ये रानमेवा विकला जात असल्याने खवय्यांच्या खिशालाही परवडणारा आहे. पनवेल परिसरात रानमेवा पीक जरी नामशेष झाले असले तरी ग्राहकांची मागणी पाहता मोठ्या प्रमाणात रानमेवा बाजारात दाखल होत आहे. सध्या ताडगोळे 120 ते 160 रुपये डझन, जांभूळ -400 ते 500 रुपये प्रति किलो, पिवळा रानमेवा-300 ते 400 रुपये प्रति किलो, करवंदे 20 ते 40 रुपये वाटा असा आहे .






