| पनवेल | प्रतिनिधी |
कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेले विविध कंपन्यांचे तब्बल 42 मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या हस्ते हे मोबाईल सुपूर्द करण्यात आले.
या जप्त केलेल्या मोबाईलची एकूण किंमत 7 लाख 73 हजार रुपये आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत, पोलीस हवालदार झोळ, पोलीस शिपाई कोकाटे, पोलीस शिपाई इलग आणि पोलीस शिपाई गायकवाड यांच्या पथकाने सीईआयआर पोर्टल आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने हे हरवलेले मोबाईल विविध राज्यांतून शोधून काढले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या उपस्थितीत मंगळवारी हे मोबाईल फोन त्यांच्या मालकांना वाटप करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस उप आयुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी कामोठे पोलीस ठाण्याच्या टीमचे अभिनंदन केले आहे.