| कर्जत | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील शासकीय आश्रम कन्या शाळा येथे रानभाज्या महोत्सव आयोजित केला होता. त्यामध्ये जंगलातून एकूण 12 प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध करून शाळेच्या सभागृहात प्रदर्शन भरले होते. यासाठी प्रत्येक वर्ग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनीने रानभाजीचे नाव, महत्व, त्यात असलेलं सात्विक गुणधर्म यांचे महत्व अधिकारी व उपस्थित पाहुण्यांना पटवून दिले.
रानभाज्या महोत्सवाला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण येथून सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रदीप सोळसकर, मुख्याध्यापक पाथरज शाळा अजित बनसोडे, उपस्थित होते. यावेळी शाळेतील लहान मुलीनी रानभाज्यावर आधारित एक सुंदर आणि महत्वपूर्ण अशी नाटिका सादर केली. शाळेचे प्राचार्य मोहन पडघान यांनी रानभाज्यांचे महत्व थोडक्यात परंतु, अतिशय मार्मिक भाषेत सांगितले. तसेच, जंक फूड, फास्ट फूड, कुरकुरे, वेफर्स व इतर रेडीमेड खाद्याच्या आहारी न जाता घरात शिजवलेले अन्नच आपल्या दैनंदिनी आहारात सेवन करण्याचा सल्ला त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थिनी, कर्मचारी यांना यावेळी दिला.
रानभाज्या महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी प्रकल्प अधिकारी पेण आत्माराम धाबे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पेण मारुती गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळाले. शाळेतील सर्व शिक्षक अधीक्षक, अधिक्षिका, तसेच विद्यार्थिनी यांनी कठोर मेहनत घेतली. उपक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गा गोंजारी यांनी केले. तर भावना दरबेश्वर यांनी आभार मानून शेवटी वंदे मातरम् गीतांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
भालीवडी आश्रम शाळेत रानभाज्या महोत्सव
