औषधी गुणांमुळे खवय्यांची पसंती
। आगरदांडा। प्रतिनिधी ।
कोंकण म्हटलं तर नवलाई, सौंदर्याने नटलेला स्वर्गच. हिरवीगार वनराई हे पावसाळ्यातील दृष्ट लागण्याजोगे दृष्य. मात्र, या सौंदर्यात अजूनही भर घालतात इथल्या आरोग्यदायक रानभाज्या. कोकणाला मोठे वनक्षेत्र लाभल्याने येथे विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. पुरातन काळापासूनच अनेक रानभाज्या आवडीने खाल्ल्या जातात. पूर्वी पावसाळयात इथल्या लोकांचे कसोटीचे दिवस होते. त्यामुळे पावसाळ्यात आदिवासी समाज व इतर गरीब समाज निसर्गाने दिलेल्या भाज्यांवर आपला उदरनिर्वाह करायचे, आज ही करित आहेत. आदिवासी मंडळींसाठी आज ही या रानभाज्या जगण्याचा मोठा आधार आहे.
जंगलांवर उपजीविका करणार्या आदिवासींना या पावसाळी भाज्यांची चांगली ओळख असते. त्यावर त्यांची घरे चालतात. या भाज्यांना हल्ली चांगली मागणी येऊ लागल्याने मुरुड शहरासह पंचक्रोशीभागातील आदिवासी महिला रानभाज्या विक्रीसाठी मुरुड बाजारात आणू लागली आहेत. यामुळे बाजारपेठ हिरवीगार दिसु लागली आहे. वर्षभर कोंबी, वायगी, पडवळ यांसारख्या नेहमीच्या भाज्या खाणारे अनेक जण पावसाळ्यात उगवणार्या रानभाज्या खेरदीसाठी तुडुन पडतात.
जंगलातील रान भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म जवळपास सारखेच असल्याने भारंग, पालक, लाल माठ अश्या विविध रानभाज्यांना खवय्यांकडून जास्त पसंती देऊन खरेदी केली जाते.