वनविभागाने उपाययोजना करण्याची गरज
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पश्चिम घाटाचा विस्तिर्ण पट्टा, विपुल जैवविविधता व डोंगरदर्यांनी वेढलेला आणि ऐतिहासिक वारशांचा ठेवा म्हणून रायगड जिल्हा ओळखला जातो. मात्र येथे वारंवार लागणार्या वणव्यामुळे वनसंपदा व पशू-पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सध्या पाली सुधागडसह जिल्ह्यात बेसुमार वनवे लागत आहेत, नष्ट होणारी सजीव सृष्टी व वनसंपदा पाहुन चिंता सतावू लागली आहे.
काही दिवसांपूर्वी विळे भागाड एमआयडीसी भागातील डोंगरावर व माळरानावर प्रचंड मोठा वणवा लागला होता. येथील स्थानिक पर्यावरण व निसर्ग अभ्यासक राम मुंढे यांनी या भागाची पाहणी केली असता या वनव्यामध्ये ठिपकेवाली मुनिया आणि इतर पक्षांची घरटी पूर्णपणे जळून गेली आहेत. शिवाय पूर्ण विकसित झालेली अंडी देखील जळाली आहेत. अशाच प्रकारचे वणवे ठिकठिकाणी लागणे सुरू झाले आहे. पालीतील सरसगड किल्ल्यावर मागील वर्षी तब्बल 6 वेळा वणवा लागला होता, यामध्ये नव्याने लावलेले रोपे व वृक्ष जळून खाक झाली होती. शिवाय येथील माकडे, वानरे व पक्ष्यांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला. तसेच त्यांचा अधिवास देखील नष्ट झाला.
जिल्ह्यात सध्या उन्हाची काहिली व तीव्रता वाढत आहे. या वाढत्या तापमानाचा फटका पक्षांना जास्त बसत आहे. अशातच डोंगर माळरानावर लागणारे वणवे घातक ठरत आहे. त्यांची दाणा-पाण्यासाठी दाही दिशा वणवण होत आहे. यासाठी मानवी वस्तीत देखील येत आहेत.
ठोस उपाययोजनांची गरज
कृत्रीम वणव्यांमुळे संपूर्ण सजिवसृष्टी धोक्यात येते. पर्यावरणाचा र्हास होतोे. त्यामुळे वणवे रोखण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून विविध उपाय व जनजागृती केली जाते. तसेच काही वेळेला विद्यार्थी पथनाट्य सादर करतात. मात्र हे प्रयत्न अपुरे आहेत. या उपयांबरोबरच स्थानिक लोकांना व आदिवासींना वणव्याचे दुष्परीणाम सांगून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. प्रामुख्याने वनविभाग, निसर्गप्रेमी व आदिवासी विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती करण्याची गरज आहे.
बहुतांश वणवे हे मानवनिर्मित असतात. नोव्हेंबर अखेरपासून व मार्च नंतर पानगळ सुरू झाल्यावर या दोन वेळा जिल्ह्यात वणवे लागत. यावेळी पक्षांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे पक्षी, त्यांचा अधिवास, त्यांची पिल्ले आणि अंडी नष्ट होतात. तसेच वणव्यामुळे महत्वाची जैवविविधता धोक्यात येते. वणवे रोखण्यासाठी वन विभागाकडून जनजागृती व प्रबोधन केली जात आहे.
समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन, अलिबाग