| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यात येत्या 18 डिसेंबरला होऊ घातलेल्या 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचे संकेत रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिले आहेत.
उरण तालुक्यातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांसोबत झालेल्या उलवे येथील बैठकीत ते बोलत होते. यावेळी रायगड जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, प्रदेश सदस्य डॉ. मनीष पाटील, उपाध्यक्ष किरीट पाटील, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, ज्येष्ठ नेते महेंद्र ठाकूर, कमलाकर घरत, भालचंद्र घरत उपस्थित होते. महाविकास आघाडीतर्फे उरण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.