समन्वय समिती स्थापन, जागावाटपाची चर्चा लवकरच
| मुंबई | प्रतिनिधी |
‘जुडेगा भारत, जीतेगा इंडिया’ असा नारा देत भाजपविरोधातील ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली. आगामी निवडणुका एकत्रित लढवण्याच्या मुद्द्यावर या बैठकीत एकमत झाले. जागावाटपाबाबत लवकरच चर्चा सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला. विविध पक्षांमधील समन्वयासाठी एक समिती स्थापण्याची घोषणाही करण्यात आली. या समितीत चौदा सदस्य असून, महाराष्ट्रातील शरद पवार व संजय राऊत यांचा त्यात समावेश आहे. इंडियाने एकत्रित निवडणुका लढवल्या तर भाजप कोणत्याही स्थितीत जिंकू शकत नाही, ही राहुल गांधी यांनी व्यक्त केलेली भावना या बैठकीचा उत्तम समारोप करणारी ठरली.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत 14 सदस्यांच्या केंद्रीय समन्वय समितीची घोषणा केली. या समितीमध्ये प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत या समन्वय समितीचे सदस्ये असतील.
इंडियाच्या बैठकीत मांडलेले ठराव
1. इंडिया आघाडीतले सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणूक आणि शक्य तितक्या विधानसभा निवडणुका एकत्र लढतील. सर्व पक्षांनी तसा संकल्प केला आहे. निवडणुकांसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया ताबडतोब सुरू केली जाईल आणि लवकरच पूर्ण केली जाईल.
2. इंडिया आघाडीतले सर्व पक्ष मिळून देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एकत्रितपणे सार्वजनिक सभा घेणार आहेत.
3. इंडियामधील पक्ष विविध भाषांमधून ‘जुडेगा भारत, जीतेगा भारत’ या इंडियाच्या मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करतील
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, पंतप्रधानांनी एलपीजीच्या किंमतीत 200 रुपये कमी केले. परंतु, ते करण्याआधी त्यांनी गॅसची किंमत अनेक पटींनी वाढवली होती. मोदीजी आधी 100 रुपये वाढवतात आणि मग 2 रुपये कमी करतात. एलपीजी आणि पेट्रोलच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. एलपीजीची किंमत 200 रुपयांनी कमी केली, परंतु, 700 रुपये अद्याप बाकी आहेत. वस्तूंच्या किमती आधी मोठ्या प्रमाणात वाढवतात आणि मग त्यात थोडीशी घट करतात. याद्वारे मोदी सरकारने लाखो रुपये कमावले, गोरगरिबांचा खिसा कापला. गरिबांचं शोषण हीच त्यांची रणनीति आहे. परंतु, आता तसं होणार नाही. इंडिया आघाडी ही परिस्थिती बदलेल. यावेळी राहुल गांधी म्हणाले, आत्ता या मंचावर जे नेते आणि वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, हे सर्वजण देशातल्या 60 टक्के लोकांचं प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे आम्ही जर एकत्र निवडणूक लढलो, तर भाजपा ती निवडणूक जिंकू शकत नाही. मला एका गोष्टीचा आनंद आहे की, या सर्व पक्षांमध्ये घट्ट संबंध तयार होऊ लागले आहेत. मला वाटतं इंडिया आघाडी भाजपाला आगामी निवडणुकीत हरवू शकते.
मोदींना सूर्यावर पाठवा लालूप्रसाद यांची टोलेबाजी
या बैठकीत लालूप्रसाद यादव यांनी मोदींना आम्ही हटवणारच असा नारा दिला आहे. काहीही झालं तरीही आम्ही जिंकणारच, जागावाटपावरुन आम्ही वाद घालणार नाही. इंडिया जिंकणार आणि मोदी हरणार असं लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. तसंच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आता मोदींना सूर्यावर पाठवावं, असा टोलाही लालूप्रसाद यादव यांनी लगावला. विविध पक्षाचे नेते वेगवेगळे होते, त्यामुळे नरेंद्र मोदी हे पुढे गेले. आमच्या एकजूट नव्हती. पण आज मला आनंद होतो आहे की आम्ही या देशाच्या विविध पक्षाचे नेते आता एकत्र आलो आहोत. आम्ही एकत्र नसल्याची किंमत देशाला मोजावी लागली. त्याचा फायदा नरेंद्र मोदी यांनी घेतला, असं लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. या देशात अल्पसंख्याक वर्ग सुरक्षित नाही. काय काय चाललं आहे तुम्हाला ते माहिती आहेच, असंही लालूप्रसाद यादव म्हणाले. सध्या चांद्रयान आपण चंद्रावर पाठवलं आहे. त्यामुळे इस्रोचं कौतुक होतं आहे. आता आम्ही ऐकलं आहे की, मोदीजी हा विचार करत आहेत की, देशाची प्रगती झाली पाहिजे. आता माझं इस्रोच्या शास्त्रज्ञांना हे आवाहन आहे की, त्यांनी नरेंद्र मोदींना सूर्यावर पाठवावं. सूर्यावर एकदा मोदी पोहचले की जगभरात त्यांचं नाव होईल, असा टोलाही लालूप्रसाद यादव यांनी लगावला.
खोटं बोला, पण रेटून बोला खरगेंचा मोदींना खोचक टोला
पंतप्रधान मोदी नेहमी खोटं बोलत असतात. पण, लोक त्याला खरे समजतात. मराठीत एक म्हण आहे, ‘खोटे बोला, पण रेटून बोला.’ असं पंतप्रधान मोदींचं आहे, असं खरगे यांनी म्हटलं आहे. ते ‘इंडिया’ आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, कोणालाही न सांगता संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. मणिपूर जळताना, कोरोनावेळी, चीन आपल्या जमिनीवर कब्जा करत आहे, तेव्हा विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं नाही. प्रसारमाध्यमे आपल्याजवळ असल्याचं मोदींच्या डोक्यात आहे. छोटे घोटाळे ते करत नाहीत. कॅगच्या अहवालात कोट्यवधींचे घोटाळे समोर आले आहेत. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ असं मोदी सांगतात. पण, सर्वांना खाण्यास देऊन लोकांना उपाशी मारत आहेत. ते भीती दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आम्ही भित्रे नाही आहोत, असं खरगे यांनी सांगितलं.
समन्वय समितीत या नेत्यांचा समावेश
के.सी. वेणुगोपाल (काँग्रेसचे सरचिटणीस)
शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष)
एम.के. स्टॅलिन (तामिळनाडूचे मुख्यमंत्री)
संजय राऊत (शिवसेना, यूबीटी)
तेजस्वी यादव (आरजेडी नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री)
अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस)
राघव चढ्ढा (आपचे खासदार)
जावेद खान (समाजवादी पक्ष)
लालन सिंग (जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष)
हेमंत सोरेन (झारखंडचे मुख्यमंत्री)
डी राजा (सीपीआय)
ओमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्सचे नेते)
मेहबुबा मुफ्ती (पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख)