अनेक नामांकित मंडळांचा निर्धार
। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी मुंबईतील गणेशोत्सव नियमांच्या चौकटीत साजरा करण्यात आला.अनेक नामांकित मंडळांनी आपला उत्सव रद्ददेखील केला. पण यंदा मात्र मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करतानाच दरवर्षीप्रमाणे उंच मूर्तीसाठी प्रशासनाला साकडे घातल्याची माहिती पुढे आली आहे. उत्सव साजरा करताना कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जाणार असल्याचेदेखील मंडळांनी यावेळी आवर्जून सांगितले.
मुंबईत दरवर्षी मोठया उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. उंच मूर्ती हे मुंबईतील गणेशोत्सवाचे आकर्षण मानले जाते. त्यामुळे देशभरातून अनेक भक्तमंडळी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई गाठतात. पण गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे या उत्सवाला नियमांची चौकट प्राप्त झाली. यात प्रामुख्याने गणेशमूर्तींची उंची कमी करून ती 4 ते 5 फुटांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली होती. यंदा मात्र मुंबईत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने गणेश मंडळांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मुंबईत लसीकरणाचा वेगदेखील वाढला असल्याने गणेशोत्सव मंडळांनी उत्सावाची तयारी सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे.