। महाड । प्रतिनिधी ।
महाड, पोलादपूर तालुक्यात दि. 22 जुलै रोजी महापुराने थैमान घातला होता. त्यामध्ये सगळीकडे हाहाकार माजला. प्रचंड नुकसान झाले. यामध्ये महाड तालुक्यातील माध्यमिक विद्यालयांचे देखील प्रचंड नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्त माध्यमिक विद्यालयांना कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. तसेच सर्व नुकसानग्रस्त विद्यालयांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
महाड तालुक्यातील कोकण एज्युकेशन सोसायटीचे महाड वि.ह. परांजपे विद्यालय, कन्या विद्यालय, दगडू शेठ पार्टे विद्यालय, आदर्श विद्यालय महाड, अंजुमन हायस्कुल, टेमघर हायस्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज तसेच इतर नुकसानग्रस्त विद्यालयांना कोकण शिक्षक आ. बाळाराम पाटील यांनी भेट देऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. निसर्गाच्या या महाप्रकोपामुळे संस्थाचालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आ. बाळाराम पाटील यांनी आधार देण्याचा प्रयत्न केला. तसेच आपण मदत मिळवून देऊ, असे आश्वासनही दिले.
यावेळी महाड, पोलादपूर तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी माध्यमिक कर्मचार्यांच्या समस्या मांडल्या आणि त्यावर चर्चा देखील करण्यात आली.त्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी लागलेल्या कर्मचार्यांचा जुनी पेन्शन योजना लागू होणे. तसेच वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी ज्या कर्मचार्यांचे प्रस्ताव सादर केलेले आहेत, त्यांना मंजुरी मिळणे, माध्यमिक विद्यालयांचे पगार एक तारखेलाच व्हावे, सातव्या वेतन आयोगाची रक्कम रायगड जिल्ह्यातील कर्मचार्यांना मिळण आदी विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
याप्रसंगी महाड कोकण एज्युकेशन सोसायटीचे संचालक दिलीप पार्टे तसेच पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवा पाटील, कामगार नेते पाटील, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव अरुण उतेकर, शिक्षक नेते संजय जैतपाल, नितीन माळवदे, तटकरे, मांडवकर, अविनाश खरे, संजय शेठ, ज्ञानदेव साळवे, बडे, ठाकूर, खिडबिडे, जया अप्पा, राजेश चोरगे तसेच कार्यकर्ते, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.