जोकोव्हिचचा आक्रमक पवित्रा
। सर्बिया । वृत्तसंस्था ।
सर्बियाचा अग्रमानांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. आतापर्यंत नऊ वेळा ऑस्ट्रेलिया ओपन जिंकलेल्या नोव्हाकडे आपलं लसीकरण झालं आहे की नाही हे जाहीर करण्यास नकार दिला आहे. मेलबर्न येथे ही स्पर्धा पार पडणार असून स्टेत ऑफ व्हिक्टोरियाने व्यावसायिक खेळाडूंसाठी लससंबंधी नियमावली जाहीर केली आहे. मात्र यावेळी त्यांनी विदेशातून येणार्या खेळाडूंसाठी सविस्तर नियमावली अद्याप दिलेली नाही.
मात्र नोव्हाकने आपली लसीकरणाची माहिती देण्यास नकार दिला आहे. गोष्टी जशा आहेत तशाच आहेत, मला अजूनही माहित नाही की मी मेलबर्नला जाईन की नाही, असं सांगितलं आहे. मी लस घेतली आहे की नाही हे जाहीर करणार नाही. ही खासगी बाब असून अशा पद्धतीची चौकशी करणं अयोग्य आहे, असंही नोव्हाकने म्हटलं आहे.
पुढे त्याने म्हटलं आहे की, आजकाल लोक एखाद्याला प्रश्न विचारताना तसंच त्याच्याबद्दल मत निर्माण करताना मर्यादा ओलांडण्याचं स्वातंत्र्य घेतात. तुम्ही होकार, नकार द्या किंवा विचार करतोय असं सांगितलं तरी ते फायदा घेणार आहेत.
ऑस्ट्रेलिया ओपनमधील स्थितीवर माझं लक्ष असून अंतिम निर्णय (करोनासंबंधित नियमावली) पुढील दोन आठवड्यात घेतला जाणार आहे. यावर्षीप्रमाणे खूप निर्बंध असतील असं वाटतं, पण जास्त बदल होतील का याबाबत मला शंका आहे, असंही त्याने सांगितलं. माझा मॅनेजर ऑस्ट्रेलिया टेनिस फेडरेशनच्या संपर्कात असून लस घेतलेल्या आणि नाही घेतलेल्या अशा सर्वांसाठी परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती दिली आहे, असं नोव्हाकने सांगितलं आहे.