न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही

रोह्यातील कुणबी युवकांचा निर्धार

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

जन्माने आणि कर्माने मूलतः कुणबी असणारा रायगड जिल्ह्यातील कुणबी समाज बांधव आज शासनाच्या सामाजिक, शैक्षणिक, नोकर भरती, व्यवसायापासून वंचित आहे. त्यामुळे त्यांच्यावर जात पडताळणीसाठी शासनाने लावलेल्या निकषावर आता कुणबी बांधव पेटून उठला आहे. त्यामुळे आता न्याय मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, वेळ पडल्यास आंदोलन छेडणार, असा आक्रमक पवित्रा रोहा तालुक्यातील कुणबी युवक बांधवांनी घेतला आहे.

रोहा तालुका कुणबी युवक मंडळाची सभा रविवारी दि.26 रोजी माजी आमदार स्व.पा.रा. सानप कुणबी भवन रोहा येथे तालुका अध्यक्ष अनंत थिटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी राज्यात सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजबांधव आंदोलनातून जागोजागी पेटून उठला आहे तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता शासनाने त्यांना आरक्षण द्यावे, यावर ओबीसी समाज तथा नेतेगण ठाम राहिले आहेत, त्यामुळे ओबीसीला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यास कोणतीही हरकत नाही तसेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा कुणबी, कुणबी मराठा या नोंदींचा डेटा गोळा केला जात आहे, परंतु शासनाला मिळत असलेल्या डेट्यापासून कोकणातील मुख्यतः रायगड जिल्ह्यातील उत्तर रायगड हा कुणबी नोंदीपासून वंचित राहिला आहे. या अनुषंगाने तालुका कुणबी युवकांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. याला शेकडोहून अधिक कुणबी युवकांनी उपस्थित राहात जात प्रमापत्रासाठी वेळ पडल्यास आंदोलन छेडणार, असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी सभेच्या सुरुवातीला मुंबई येथे 26/11च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना आदरांजली अर्पण करून तसेच संविधान दिवस म्हणून तसेच कुणबी समाज नेत्यांना अभिवादन करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन सचिव मंगेश देवकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रवी शिंदे यांनी केले.

Exit mobile version