| गडब | वार्ताहर |
अभि नही तो कभी नही; पिण्याचे पाणी मिळाल्याशिवाय आता मागे हटायचं नाही, असे प्रतिपादन शिवसेना उबाठा गटाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विष्णू पाटील यांनी पेण तालुक्यातील वाशी येथे खारेपाट विकास संकल्प संघटनेने सुरु केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देताना केले. मागील अनेक वर्षांपासून वाशी खारेपाट विभागाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. राज्यकर्ते व प्रशासनाच्या या अन्यायाविरोधात पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेमार्फत वाशी येथील जगदंबा मंदिराच्या प्रांगणात आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. या उपोषणास शिवसेना संपर्कप्रमुख विष्णू पाटील यांनी आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, शिवसेना ज्येष्ठ नेते जीवन पाटील, युवा नेते समीर म्हात्रे, कासूचे माजी सरपंच नारायण पाटील, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विष्णू पाटील म्हणाले की, खारेपाट विभागातील जनतेने पक्षीय चपला बाजूला ठेवून या आंदोलनात सामील व्हावे. 1992 साली आम्ही तत्कालीन निप्पॉन कंपनीविरोधात पाण्यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी परिसरातील जनतेने आक्रमक भूमिका घेतली तेव्हा कुठं कासु-आमटेम विभागाला 24 तास पिण्याचे पाणी मिळाले. त्याकाळात जरी आमच्यावर गुन्हे दाखल झाले असले, तरी मात्र त्या विभागातील जनतेला पिण्याचे पाणी मिळाले.
वाशी विभागातील 52 गावातील लोकांनी जागृत होऊन एक दिलाने ही लढाई लढली पाहिजे. खारेपाट विभागातील जनतेने एकत्र यावे. हीच वेळ आहे, आता आपल्याला मुबलक पिण्याचे पाणी मिळाल्याशिवाय मागे हटायचं नाही, असंही विष्णू पाटील यांनी म्हटलं. या आंदोलनाला सामाजिक संघटना, राजकीय नेते व विविध संघटनाचा पाठिंबा मिळत आहे. पुढील काळात सदर आंदोलन कमजोर करण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे, मात्र त्याला बळी पडू नका असे सांगतानाच विष्णू पाटील पुढे म्हणाले की, आता नाही तर पुढे कधी नाही असंच समजून ही लढाई लढली पाहिजे, असेही उपस्थित ग्रामस्थांना जाहीर आवाहन त्यांनी केले.
पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेतर्फे वाशी येथील आमरण उपोषणाला नंदा म्हात्रे, हेमंत पाटील, जितेंद्र ठाकूर, अभि म्हात्रे-विठ्ठलवाडी, दिलीप म्हात्रे-भाल, स्वप्निल म्हात्रे, चंद्रहास म्हात्रे, अश्विनी ठाकूर, अजित पाटील बसले आहेत.







