भीमाशंकर रस्त्यासाठी गडकरींना घालणार साकडे

। नेरळ । प्रतिनिधी ।
चाकण भागातील परिसर मुंबईला जवळ करण्यासाठी महत्वाचा ठरणारा पनवेल-कशेळे-भीमाशंकर या प्रस्तावित मार्गाचे काम जलदगतीने व्हावे या मागणीसाठी भीमाशंकर घाटरोड संघर्ष समिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार आहेत. त्यावेळी संघर्ष समिती कडून गडकरी यांना रस्त्याच्या कामासाठी साकडे घातले जाणार आहे.
पनवेल-नेरे-म्हाळडूगे-कोठिंबे-वांद्रे-भीमाशंकर-मंचर असा नवीन मार्ग प्रास्तवित आहे. या राज्यमार्गाचे काम देखील सुरु आहे, पण मुंबई-पुणे अंतर कमी करणार्‍या या रस्त्याच्या पूर्णत्वासाठी राजकीय महत्वकांक्षा महत्वाची आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग करून जलदगतीने करण्याचे आश्‍वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी 20 वर्षे पाठपुरावा करणार्‍या भीमाशंकर घाटरस्ता संघर्ष समितीच्या पदाधिकारी यांची कर्जत येथे सुनील गोगटे यांच्या कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून या नवीन मार्गाच्या पूर्णत्वासाठी साकडे घालण्याचे नियोजन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. त्यावेळी पुणे जिल्ह्यातील वांद्रे, मंचर भागातील संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version