| पाली/गोमाशी | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाला सोबत घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करता येणार नाही. जिल्ह्यात महिला आघाडी संघटन मोठ्या प्रमाणावर संघटित झाले तर जिल्ह्यातील वातावरण बदलेल. विरोधक मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांना बिघडवत आहेत. अनेकांना पक्षाच्या माध्यमातून अनेक मोठी पदे दिली, मंत्री बनवले, आमदार, खासदार केले, तेच पक्षाच्या विरोधी कामे करत आहेत. मात्र, पुढील काळात त्यांना त्यांची जागा दाखवून देणार, असा इशारा शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिला आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या सुधागड तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा रविवारी (दि.9) संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे स्व. नामदेव शेठ खैरे सभागृहात आयोजित केला होता. यावेळी जयंत पाटील यांनी आगामी काळात पक्षाच्या वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट करीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हा चिटणीस निवडायचा होता, त्यावेळी तीन-चार जणांची नावे होती. मात्र, सर्वानुमते सुरेश खैरे यांची निवड करण्याचे ठरले. सुरेश खैरे हा पक्षाबरोबर एकनिष्ठ असलेला गरीब कार्यकर्ता आहे. हा या पदाला योग्य न्याय देईल, याची खात्री आहे. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना अतिशय नियोजनपणे बँकेचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी सांगीतले की, सुधागड तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांमध्ये मनोधैर्य वाढविण्यासाठी हा संवाद मेळावा होत आहे. जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षला विधानसभा निवडणुकीत 6.5 लाख मते मिळाली. विधानसभेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष संपला असे बोलले जात होते. मात्र, सर्वात जास्त मते ही शेतकरी कामगार पक्षाला मिळाली. येत्या काळात सर्व कमिट्या तयार करून पुन्हा जोमाने कामाला लागू. तसेच, तालुक्यातील पक्ष संघटनेमुळे मला काम करण्याचे बळ मिळते. या छोट्याशा तालुक्यातील लहान कार्यकर्त्याला तुम्ही जिल्हा चिटणीसपद दिले त्याबद्दल विशेष आभार व्यक्त करतो. येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंचायत समितीवर लाल बावटा फडकवू, असा निर्धारही खैरे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, माजी राजिप अध्यक्षा सुप्रिया पाटील, राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, खजिनदार महाराष्ट्र राज्य अतुल म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाची पुन्हा एकदा आपली ओळख करून देणे गरजेचे आहे. शेतकरी कामगार पक्ष हा चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आहे. भाजपा मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणाचा वापर करून आपलं वर्चस्व निर्माण करत आहे. रायगड जिल्ह्यात शेकापने स्वबळावर लढत देऊन मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवले. सत्ताधारी तिसर्या मुंबईच्या नावाखाली मोठ्या प्रकल्प शेतकरी व शेतमजूर याच्यावर लादत आहेत. मात्र, शेतकरी कामगार पक्ष हा नेहमी भूमीपुत्रांच्या सोबत राहून लढा देणार. स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष कटिबद्ध राहील. आज हा मेळावा प्राथमिक स्वरूपाचा आहे. येणार्या काळात पक्षबांधणी करून पक्ष वाढवण्यासाठी आपण सर्व एकत्र संघटित होऊन जोमाने काम करू.
अतुल म्हात्रे, शेकाप राज्य खजिनदार