पेण येथे संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाने ज्यांना मोठे केले, त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. त्या गद्दारांना ठेचण्याचे काम आपल्याला आगामी काळात करायचे आहे. एक वेगळ्या भूमिकेतून आपण काम करणार आहोत. पक्षाशी प्रामाणिक व एकनिष्ठ असणार्यांनाच पक्षात चांगली जागा देण्याची भूमिका राहणार आहे. उद्याचा सूर्य हा आपलाच असणार आहे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले. पेण व इतर तालुक्यात येणार्या तिसर्या मुंबईत भूमीपुत्रांचा विचार होणे आवश्यक आहे. विकासाला शेकापचा विरोध नाही. पण, स्थानिकांना विचारात घेऊन शासनाने काम करावे, अन्यथा चरी, वाशी येथील शेतकर्यांची लढ्याची परंपरा पुन्हा चालू करावी लागेल, असे मत जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

शेतकरी कामगार पक्ष पेण तालुका संवाद मेळावा आगरी समाज हॉलमध्ये रविवारी (दि.09) घेण्यात आला. यावेळी जयंत पाटील बोलत होते.
यावेळी माजी आ. बाळाराम पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप चिटणीस मंडळाचे खजिनदार अतुल म्हात्रे, पी.डी. पाटील, मोहिनी गोरे, सुनंदा म्हात्रे, दिपक पाटील, प्रकाश शिंगरुत, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका संजना कीर, प्रल्हाद पाटील, रोशन पाटील आदी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले की, पेणचा एक वेगळा इतिहास आहे. पेणमधील गणेशमूर्ती तयार करणारे प्रसिद्ध केंद्र जगाच्या कानाकोपर्यात पोहोचले आहे. मूर्तींना रंग लावण्यापासून तयार केलेल्या मुर्तींची वाहतूक करण्यापर्यंतची कामे केली जातात. यातूनच हजारो हातांना काम मिळत आहे. येथील मुर्तीकारांचे प्रश्न सोडविण्यास सरकार उदासीन ठरले आहे. मात्र शेतकरी कामगार पक्ष कायमच मुर्ती तयार करणार्यांसोबत आहे. शेकाप सर्व शक्तीनिशी त्यांच्या सोबत राहणार आहे, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, वेगवेगळे राजकीय बदल पेणमध्ये झाली आहेत. परंतु येथील कार्यकर्ता पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिला आहे. पक्षाने ज्यांना आमदार केले. ते पक्षाला सोडून गेल्याचे चित्र नवीन नाही. परंतु विधानसभेच्या पराभवानंतर पुन्हा एकदा वेगळ्या उमेदीने कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. अतुल म्हात्रे यांच्या सारखा अभ्यासू व जनतेशी बांधिलकी असलेला नेता पेणमध्ये लाभला आहे. येथील जनतेचे प्रश्न म्हात्रे यांच्यामार्फत नक्की सुटतील, असा विश्वास आहे.
कष्टकरी, कामगारांसह बहुजनांची शैक्षणिक, सामाजिक उन्नती हाच आपला विचार आहे. आगामी काळात पक्ष संघटनेत अमुलाग्र बदल केले जाणार आहे. तरुणांसह पक्षाशी एकनिष्ठ व कर्तृत्व व बांधिलकी असणार्यांना संधी दिली जाणार आहे. शेतकर्यांना फसवून प्रकल्पाच्या नावाखाली जमीन लादणार्यांविरोधात लढून आपली भूमिका स्पष्ट करायची आहे. शोषित, पीडितांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारा शेतकरी कामगार पक्ष आहे. एक वेगळ्या भूमिकेतून सर्व कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. आपल्या विचाराच्या मंडळींना एकत्र करून पक्षाची ध्येयधोरणे त्यांच्यामध्ये रुजवायचे काम प्रत्येक कार्यकर्त्याने करणे गरजेचे आहे. जे गद्दारी करतात, त्यांना खड्यासारखे बाजूला सारायचे आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. प्रकल्पाला विरोध करणार्यांना मोक्का लावला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले, त्यांचे हे विधान लोकशाहीला घातक आहे. आम्ही जनतेच्या न्याय्य हक्कासाठी लढणारे आहोत. जे हप्ते घेतात, त्यांना मोक्का लावा, असा इशारा मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिला.