| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष पेण तालुका संवाद मेळावा आगरी समाज हॉलमध्ये रविवारी (दि.09) पार पडला. महिला संघटनेची पुनर्बांधणी करण्याचे अभिवचन महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे यांनी दिले. पेण तालुका संवाद मेळावा पार पडला त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाचा झंझावत जिल्ह्यात निर्माण झाला आहे. एक वेगळी ऊर्जा या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. स्थानिक भूमीपुत्रांचे हक्क, अधिकार शाबूत ठेवले पाहिजे या भूमिकेतून शेकाप काम करणारा पक्ष आहे. महिलांची संघटना वाढविण्याची गरज असून, महिलांचे सक्षमपणे संघटन निर्माण होणे आवश्यक आहे, असे शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे म्हणाल्या. पुढे त्यांनी सांगितले की, सध्या देशातील राजकारण व समाजकारणाची परिस्थिती भयावह आहे. महिलांना समानतेची वागणूक मिळते का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु, शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा वेगळी आहे. महिलांना शेतकरी कामगार पक्षात समानतेची वागणूक दिली जाते. महिलांचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी संघटन वाढविण्याची गरज आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दीड हजार रुपये देऊन त्यांना दुर्बल करण्याचे काम सरकार करीत आहेत, असा आरोप अॅड. म्हात्रे यांनी केला.
प्रभावीपणे काम करणार – सुरेश खैरे

कालपासून शेतकरी कामगार पक्षाचा दौरा जिल्ह्यात सुरु झाला आहे. उरण, पनवेलमधून या संवाद मेळाव्याची सुरुवात झाली. या मेळाव्याला कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. संवाद मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आज पेणमध्ये हा मेळावा होत असून, या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहून भरपूर आनंद झाला. याच पेणमध्ये ज्यांच्याकडे कित्येक वर्षे आमदारकी होती, ते पक्षाला सोडून गेले. अतुल म्हात्रे यांच्यासारखे अभ्यासू नेतृत्व मिळाले आहे. शेतकर्यांच्या बाजूने लढा देणारा नेता पेण तालुक्यात लाभला आहे. त्यामुळे शेकापच्या संवाद मेळाव्यातून कार्यकर्र्यांना एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे.
शेतकर्यांना त्रासदायक ठरणारा सेझ प्रकल्प याच पेणमधून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून हद्दपार केला. शेतकरी कामगार पक्षाच्या मार्फत केलेल्या लढ्यामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष वाढीसाठी एक वेगळ्या भूमिकेतून काम केले जाणार आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामार्फत चिटणीस मंडळ प्रभावी तयार केले जाणार आहे. स्वतंत्र बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सुरेश खैरे यांनी सांगितले.
भूमीहीन करणार्या विकासाला रोखण्याची गरज – अतुल म्हात्रे

दोन दिवसांपासून जिल्ह्यात कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला आहे. पक्ष संघटन व पक्षाची भूमिका मांडण्याचे काम या संवाद मेळाव्यातून होत आहे. मागील निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले, तरीदेखील पक्ष संघटन मजबूत असल्याचे चित्र संवाद मेळाव्यातून दिसून येत आहे. शेतकरी कामगार पक्ष हा लढवय्या पक्ष आहे. आपल्या पक्षाची ओळख फक्त राजकीय नसून, सामाजिक बांधिलकीतून काम करणारा पक्ष म्हणून आहे. कष्टकरी, कामगार, शेतकरी व गोरगरीबांच्या हितासाठी अनेक लढे, आंदोलने केले. ते लढे, आंदोलन यशस्वी करून गोरगरीबांना न्याय देण्याचे काम केले आहे. याची जाणीव प्रत्येकाला आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती काय आहे, हे सर्वांना माहीत आहे. मात्र, सर्वसामान्यांचे प्रश्न लावून धरण्याचे काम फक्त शेतकरी कामगार पक्षच करू शकतो, ही भावना आजही जनमानसात आहे. आपली ओळख वेगळी आहे. या भागात तिसरी मुंबई येऊ घातली आहे. येत्या काळात शेतकर्यांच्या हितासाठी वेगळी भूमिका आपल्या सर्वांना घ्यायची आहे. भूमीपुत्रांना न्याय मिळावा, यासाठी आपल्याला लढे देण्याची गरज आहे. नवी मुंबईचा विकास होत असल्याचे चित्र असले, तरीही भांडवलदार श्रीमंत होत गेले आहेत. परंतु, येथील भूमीपुत्र रिक्षा चालवत आहे. महिला घरकाम करीत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे या भागात नवी मुंबईसारखी भूमीपुत्रांची अवस्था होऊ नये यासाठी आपल्याला पावले उचलावी लागणार आहे. भूमीपुत्र भागीदार बनला पाहिजे. भूमीपुत्रांना भूमीहीन करणार्या विकासाला बाहेर फेकण्याची आवश्यकता आहे, असे अतुल म्हात्रे म्हणाले.