31 नक्षलींचा खात्मा; दोन जवान शहीर, दोघे गंभीर
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात रविवारी (दि.9) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 31 नक्षलवादी ठार झाले. चकमकीदरम्यान चार जवान गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे.
रविवारी सकाळी बिजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवरील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात सुरक्षा कर्मचार्यांचे एक पथक नक्षलविरोधी कारवाईवर असताना चकमक सुरू झाली. या चकमकीत 31 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. आयजी बस्तर पी सुंदरराज यांनी सांगितले की, चकमकीदरम्यान चार सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोन सैनिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दोन जखमी सैनिकांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. यावर्षी 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत राज्यात वेगवेगळ्या चकमकीत 50 हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. छत्तीसगड पोलिसांच्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी आतापर्यंत विविध चकमकींमध्ये 219 नक्षलवाद्यांना ठार मारले आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी सैनिकांच्या बलिदानाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत दोन सैनिक शहीद आणि दोन जखमी झाल्याची दुःखद बातमीदेखील मिळाली आहे. सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. मार्च 2026 पर्यंत राज्य नक्षलवादापासून मुक्त होईल, अशी माहिती दिली.