तिनवीराजवळील दरोड्यात तीन पोलिसांचा समावेश
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग-पेण मार्गावरील तीनविरा धरणाजवळ दरोडा टाकण्यात आला. यामध्ये एक कोटी 50 लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाल्याची माहिती पोयनाड पोलिसांनी दिली. ही घटना मंगळवारी (दि.4) दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान घडली. या गुन्ह्यातील पाच आरोपींपैकी तीन आरोपी रायगड पोलीस दलातील पोलीस कर्मचारी असून, दोन आरोपी अलिबागमधील एका सत्ताधारी नेत्याचे अगदी जवळचे असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा सत्ताधारी नेता कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी समाधान पिंजारी याने नागपूर येथील सोन्याचे व्यापारी नामदेव हुलगे यांच्याशी काही दिवसांपूर्वी संपर्क साधला. शंकर कुळे याच्याकडे 7 किलो सोने असून 5 कोटी रुपयांमध्ये देतो, असे हुलगे यांना आमिष दाखविले. स्वस्त दरात सोने मिळत असल्याने ते खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 1 कोटी 50 लाख रुपये घेऊन हुलगे, दीप गायकवाड व इतर मंडळी एका कारमधून अलिबागकडे निघाले. तिनविरा धरणाजवळ आल्यावर गायकवाडने कार थांबविली. पोलीस आले आहेत, असे सांगून फिर्यादी व त्यांचा सहकारी यांना गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. त्यानुसार ते गाडीतून उतरले. त्याचवेळी दीप गायकवाडने कार सुरू करून तेथून पळ काढून पनवेलच्या दिशेने पळ काढला. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलीस हवालदार समीर म्हात्रे, विकी साबळे व सूर्यवंशी यांचा सहभाग असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. यातील सूर्यवंशी हा अलिबाग पोलीस ठाण्याचा ‘कलेक्टर’ असल्याचे समजते.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने चौघांना अटक केली आहे. त्यामध्ये समीर म्हात्रे, विकी साबळे, समाधान पिंजारी, दीप गायकवाड यांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले. त्यांच्याकडून दीड कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे.