| नेरळ | प्रतिनिधी |
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था तातडीने सुधारावी आणि सर्व रस्ते खड्डेमुक्त करावेत अशी मागणी नवी दिल्लीच्या पोलीस मित्र संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. गणपती उत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास गणेश स्थापनेच्या दिवशी खड्ड्यांमध्ये बसून बाप्पाला मांडीवर घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच रस्ते दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत बाप्पाचे विसर्जन केले जाणार नाही, असा सज्जड इशारा संघटनेने प्रशासनाला दिला आहे. संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी, कर्जत तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम उपविभाग आणि सा.जि.प. बांधकाम उपविभाग यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी पोलीस मित्र संघटनेने रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात उपोषणे करून रस्ते खड्डेमुक्त करून घेतले होते. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. यंदा पुन्हा तालुक्यातील अनेक रस्त्यांची चाळण झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे गणेश भक्तांना व प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असून, विविध बांधकाम खात्याने रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी पोलीस मित्र संघटनाईने केली आहे. दरम्यान, गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही, तर गणेशभक्तांसह रस्त्यावरील खड्ड्यांत बसून अनोखे आंदोलन केले जाईल आणि तालुक्यातील रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त होईपर्यंत विसर्जन रोखले जाईल, असा इशार संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.







