रोह्यात शेकाप कार्यकर्ता आढावा बैठक उत्साहात
| कोलाड | वार्ताहर |
लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात पक्षाचा संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. तद्नंतर पुन्हा पक्षाची नव्याने मोर्चेबांधणी आणि कार्यकर्त्यांच्या पदावरील नव्याने नियुक्त्या यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेत कार्यर्त्यांच्या नवीन पद नियुक्त्या नेमणूक करण्यात येत आहेत. यासाठी रोहा येथे बुधवारी (दि.5) कार्यकर्ता आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी तालुकास्तरावरील पक्षाच्या कार्यकर्ता नियुक्तीच्या आढावा बैठकीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, येत्या काळात नवे कार्यकर्ते घडवून पक्षाचा पाया भक्कम करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी कार्यकर्त्यांसमवेत केले.
रोहा येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृहात संपन्न झालेल्या कार्यकर्ता आढावा बैठक जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रालेखा पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर, जिल्हा बँकेचे संचालक गणेश मढवी, बँक मॅनेजर प्रतीक नाईक, मारुती खांडेकर, गोपीनाथ गंभे, शिवराम महाबले, संदेश विचारे, गांगल ताई, कांचन माळी यांच्यासह तालुक्यातील आजी-माजी तालुका चिटणीस, प्रमुख कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होत्या.
या बैठकीत मार्गदर्शन करताना खैरे पुढे म्हणाले की, आपण महाविकास आघाडीतून लोकसभा, विधानसभा निवडणूक लढलो. त्यात जरी आपला पराभव झाला असला, तरी कोणीही खचून जाऊ नका. आपले नेते शेकापचे सरचिटणिस जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा जोमाने पक्षाला बळकटी मिळत आहे. त्याचे प्रत्यय संवाद मेळाव्यात आला. त्यासाठी पुन्हा आपण जिद्दीने एकत्रित येऊन काम करू. पुढील येणार्या स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका या जिंकण्यासाठी येत्या काळात पक्षाचा पाया भक्कम करून पुन्हा लाल बावटा फडकेल यासाठी कार्यतत्पर होतकरू युवक, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या यांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने नावे पुढे येत असल्याचा आनंद व्यक्त करत या नियुक्त्या लवकरच पक्षनेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार असल्याचे खैरे म्हणाले म्हणाले.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर म्हणाले की, रोह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने संघर्ष करून अनेक समस्यांवर पूर्वी न्याय दिला आहे. तसेच, येत्या काळात कुंडलिका सिंचनातून बारमाही वाहणारे उजवा तीर आणि डावा तीर कालव्याच्या पाण्यासाठी तसेच येथील शेतकर्यांची तेराशे हेक्टर जमीन ही पुन्हा ओलिताखाली आणू, त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात शेतकर्यांची घरे, जमिनी सरकारने अल्प दरात संपादित केली, अशा अल्पभूधारक शेतकर्यांनादेखील जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागोठणे-इंदापूरदरम्यानच्या बाधित शेतकर्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
दरम्यान, रोहा तालुका चिटणीस, कामगार आघाडी, शेतकरी संघटना, पुरोगामी आघाडी, पुरोगामी विद्यार्थी आघाडी, महिला आघाडी, रस्तेबाधित शेतकरी संघटना, आदिवासी संघटना, आदिवक्ता, प्रवक्ता, अल्पसंख्याक, पुरोगामी शिक्षण आघाडी, झोपडपट्टी पुरोगामी, मच्छीमारी संघटना, आपत्कालीन व्यवस्थापन संघटना यांच्यासह विविध पदांवर नव्याने कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहेत. जिल्ह्याभर तसेच तालुका स्तरावर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार, त्यात पक्षाची विचारसरणी, पक्षसंघटना सोशल मीडियाचा वापर, शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, कामगार यांच्या न्याय्य हक्कासाठी सदैव प्रयत्नशील कसे राहता येईल, असे कार्यकर्त्याला सक्षम प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. तर, कार्यकर्तेपद निवडीत जयंत पाटील हे जे नव्याने कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नेमणूक करतील, ते सर्वांना मान्य असल्याचे या आढावा बैठकीतून कार्यकर्त्यांकडून सर्वानुमते सांगण्यात आले.