आशासेविका, अंगणवाडी सेविकांची निवड; 9 हजार 150 महिलांना प्रशिक्षण
। रायगड । सुयोग आंग्रे ।
ग्रामीण भागातील पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत आता गावस्तरावर कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत हे काम केले जाणार आहे. त्यासाठी त्यांची निवड केली असून, तालुकास्तरावर प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे.
पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील गावस्तरावर पाणी गुणवत्ता तपासणीसाठी पाच महिलांची निवड केली आहे. त्यात आशा सेविका व अंगणवाडी सेविका व बचत गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांच्यामार्फत आता गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे फिल्ड टेस्ट किटद्वारे (एफटीके) पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी केली जाणार आहे. त्यातील सक्रिय महिलांची प्रशिक्षणासाठी निवड केली आहे. त्यांना तालुकास्तरावर प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानंतर ते गावातील उर्वरित महिलांना प्रशिक्षण देणार आहेत. त्यांच्यामार्फत फिल्ड टेस्ट किटद्वारे गावातील पिण्याच्या नळपाणी पुरवठा जलस्त्रोतांसह शाळा, अंगणवाडीत पिण्यासाठी वापरल्या जाणार्या जलस्रोतांची तपासणी केली जाणार आहे.
पाणी गुणवत्ता तपासणीसाठी जिल्ह्यातील 1 हजार 830 गावातील प्रत्येकी 5 अशा एकूण 9 हजार 150 सक्रिय महिलांची निवड केली आहे. त्यापैकी प्रत्येक गावातील एका महिलेला फिल्ड टेस्ट किटचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणानंतर उर्वरित चार महिलांना प्रशिक्षण देऊन पाणी तपासणीला सुरुवात होणार आहे. पाणी तपासणीची माहिती केंद्र सरकारच्या ‘ई-जलशक्ती’ संकेतस्थळावर भरली जाणार आहे. नव्या यंत्रणेचा विचार ग्रामीण भागात गावस्तरावर आरोग्य सेवक व जल सुरक्षकांमार्फत पाण्याचे नमुने घेतले जायचे. त्यांच्याकडून ते जिल्हास्तरीय व उपविभागीय स्तरावरील प्रयोगशाळांमध्ये पाठवले जायचे. त्यातील अडचणी दूर करण्यासाठी आणि व्यापक प्रमाणात नियमित पाणी तपासणीसाठी आता कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्यात येत आहे. त्यांच्यामार्फत आता गावातील पिण्याच्या जलस्रोतांचे नमुने घेऊन तपासणी केली जाणार आहे.
तपासणीचा उद्देश
गावातील लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून देणे, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता रोजच्या जीवनात किती महत्त्वाची आहे हे सांगणे, पाणी दूषित होण्याची विविध कारणे, अशुद्ध पाण्याचे परिणाम, पाणी, स्वच्छता व आरोग्य यांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे, फिल्ड टेस्ट किटच्या सहाय्याने पाणी तपासणीचे महत्त्व विशद करणे.
आरोग्य सेवक व जलसुरक्षा रक्षक यांच्यामार्फत नियमित पाणी गुणवत्ता तपासणी होणार आहे. त्याशिवाय आता गावातील पाच महिलांमार्फत फिल्ड टेस्ट किटद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे. त्याद्वारे पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवतानाच त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, पाणी व स्वच्छतेबाबत त्यांना सजग करण्याचा प्रयत्न आहे.
शुभांगी नाखले,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
पाणी व स्वच्छता विभाग, रायगड जिल्हा परिषद