हार्दिक पांड्याची संधी हुकण्याची शक्यता
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेट संघ टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यात भारत तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. टीम इंडियाचे प्रमुख शिलेदार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. यामुळे बीसीसीआय, निवड समिती आणि प्रशिक्षकांपुढे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम भारताचा कर्णधार कुणाला करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. टी-20 विश्वचषकमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार असणाऱ्या हार्दिक पांड्याचे नाव कर्णारपदाच्या शर्यतीत होते. मात्र, निवड समिती आणि प्रशिक्षकांनी 2026 च्या टी-20 विश्वचषकचा विचार करुन दीर्घकालीन ध्येय डोळ्यासमोर ठेवत वेगळा विचार केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवचे नाव आघाडीवर असल्याच्या चर्चा आहे.
अजित आगरकर अन् गौतम गंभीरचा कल सूर्यकुमार यादवच्या बाजूने
निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांची पसंती सूर्यकुमार यादवच्या नावाला असू शकते. कारण, सूर्यकुमार यादवकडे ते 2026 च्या टी-20 विश्वचषक संघातील प्रमुख शिलेदार म्हणून पाहतात. भारतात 2026 चा टी-20 विश्वचषक आयोजित करण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादवने यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्समध्ये गौतम गंभीरच्या प्रशिक्षणामध्ये क्रिकेट खेळलेले आहे.