| मुंबई | प्रतिनिधी |
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने तीन वर्षांपूर्वी ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांकरिता व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण योजनेद्वारे नागपूर उड्डान क्लबसोबत करार होऊन प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण होत असताना मात्र उड्डाणाचे तास पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर नोकरीची संधी गमावण्याची वेळ आली आहे. ती संधी त्यांना मिळणार का, असा सवाल शेकापक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी (दि. 11) विधान परिषदेत उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.
यावर उत्तर देताना इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले की, नागपूर उड्डान क्लब ही महाराष्ट्रातील एकमेव राज्य शासनाच्या मालकीची वैमानिक प्रशिक्षण संस्था असून, व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणाकरिता नागपूर उड्डाण क्लब आणि महाज्योति यांच्यामध्ये करार झाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांची नोकरी गमावण्याची भीती नाही. तसेच नागपूर उड्डाण क्लब यांच्या संरक्षणात्मक व्यवस्तेमध्ये वाढ करणे तसेच प्रशिक्षणासाठी आवश्यक तांत्रिक अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक आणि प्रवेश क्षमता तयार करण्यासाठी रूपये 2.50 कोटी तसेच प्रति प्रशिक्षणार्थी 25 लाख रूपये अशा एकूण 20 विद्यार्थ्यांसाठी 5 कोटी असा एकूण 7.50 कोटी इतका निधी सामंजस्य करारानुसार देण्यात आला आहे. महाज्योति प्रायोजित प्रशिक्षणार्थ्यांचे उड्डाण प्रशिक्षण पुढील एक वर्षात पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात येईल. जेणेकरून त्यांना पुढील उच्च प्रशिक्षण किंवा नोकरीची संधी गमावण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही, असे आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी दिले आहे.
वैमानिकांचे प्रशिक्षण पूर्ण केलल्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळणार का-जयंत पाटील
