उद्धव ठाकरेंचा मावळमध्ये जनसंवाद मेळावा
| पनवेल | प्रतिनिधी |
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 4) जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात उबाठा गटाकडून मावळ लोकसभा मतदारसंघाच्या 2024 च्या उमेदवाराची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उबाठा गटात प्रवेश केलेल्या संजोग वाघेरे पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे.
पुणे आणि रायगड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघ मिळून 2008 साली मावळ लोकसभा मतदारसंघाची स्थापना करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड मावळ तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण विधानसभा मतदार संघाचा समावेश असलेल्या या लोकसभा मतदार संघावर शिवसेनेने आतापर्यंत एक हाती वर्चस्व राखले असून, विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे सेनेच्या धनुष्य बाण या चिन्हावर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत सलग दोन वेळा विजयी झाले आहेत. मागील वर्षी सेनेत घडलेल्या अभूतपूर्व फाटाफुटीनंतर खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. खासदार बारणे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे व्यथित झालेल्या उबाठा गटाचे नेते मावळ लोकसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्याच्या ईर्षेने कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने मावळ मतदार संघातील सर्वात जास्त मतदार संख्या असलेल्या पनवेल विधानसभा क्षेत्रातील मतदारांना साद घालण्यासाठी सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, संभाव्य उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनदेखील या वेळी करण्यात येणार आहे.
संजोग वाघेरे पाटील यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड पालिकेचे महापौरपद भूषवले आहे.वाघेरे पाटील यांचे वडीलदेखील पिंपरी चिंचवड पालिकेच्या महापौरपदी निवडून आले होते, तर वाघेरे पाटलांच्या पत्नीनीदेखील नगरसेविकापदी निवडून येऊन स्थायी समिती सभापतीपद भूषवले असल्याने आपले होम ग्राऊंड असलेल्या पिंपरी चिंचवड मतदार संघाऐवजी मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त मतदार संख्या असलेल्या पनवेल विधानसभा मतदार संघातून प्रचाराचा नारळ फोडण्याचा निर्णय वाघेरे पाटील यांनी घेतला असल्याची चर्चा परिसरात आहे.
मावळमधील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार (2019)
1) पनवेल : 514902
2) चिंचवड : 476780
3) पिंपरी : 341701
4) मावळ : 332112
5) कर्जत : 275480
6) उरण : 286658
