| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील हालीवली गावातील स्मशानभूमीत जादूटोणा करताना काही अनोळखी व्यक्ती आढळून आले आहेत. हा प्रकार शुक्रवारी, (दि.11) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, हालीवली गावाच्या आदिवासी वाडीच्या स्मशानभूमीत काही अनोळखी व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि दोघांना पकडून चांगलाच चोप दिला. दरम्यान, त्यांच्या सोबत असलेले चौघे इसम घटनास्थळावरून पळून गेले. आदिवासी तरुणांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पकडण्यात आलेल्या दोघांमध्ये शिंदे नामक स्थानिक असून, दुसरा व्यक्ती पाली-सुधागड येथील असल्याचे समजते. पोलिसांनी याबाबत माहिती घेतली असून, अधिक तपास सुरू आहे. या प्रकारामुळे समाजात आजही अंधश्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अशा रूढींविरुद्ध समाजात जागरूकता निर्माण करणे आणि कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. कर्जत पोलिस ठाण्याकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
हालीवली गावातील स्मशानभूमीत जादूटोणा?
