लाल फडका, पिठाच्या गोळ्यामुळे रहिवाशामध्ये भीतीचे वातावरण
। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
कामोठे सेक्टर 35 मधील ‘प्रतीक जेम्स’ ही नावाजलेली आणि उच्चभ्रू मानली जाणारी सोसायटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच या सोसायटीत 25 तोळे सोन्याची चोरी झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेचा तपास अद्याप सुरु असतानाच आज पुन्हा एक विचित्र आणि अघोरी, जादू टोण्याचा घटनेने सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ज्या सोसायटीच्या पर्ल इमारतीमधील घरात चोरी झाली त्याच इमारतीमध्ये हा अघोरी प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
गुरुवारी (दि.23) सांयकाळी 4.00 वाजता सोसायटीच्या ‘पर्ल’ इमारतीच्या १३व्या मजल्यावर एका लाल रंगाच्या फडक्यात गुंडाळलेली, पिठाच्या गोळ्याने बनवलेली विचित्र प्रतिकृती याच सोसायटीमधील पर्ल इमारतीमध्ये राहणाऱ्या एकाला दिसून आले आहे. त्यांनी प्रथम सोसायटीच्या सोशल मिडीया ग्रुपमध्ये माहीती दिली. ही वस्तू पाहताच परिसरातील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली. काहींनी याला ‘जादूटोणा’ किंवा ‘भानुमतीचा प्रकार’ असल्याचे म्हटले. सोशल मीडियावरही या घटनेचे फोटो व्हायरल झाले आहेत.
विशेष म्हणजे, ज्या मजल्यावर ही प्रतिकृती ठेवलेली आढळली; त्याच मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये काही दिवसांपूर्वीच 25 लाखाच्या सोन्याची चोरी झाली होती. त्यामुळे या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का, याची चर्चा सध्या सोसायटीत जोरात सुरू आहे. रहिवाशांमध्ये या घटनेमुळे भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. काहींनी हे कृत्य कुणाच्यातरी धाक दाखविण्याचा किंवा अंधश्रद्धेमुळे केलेला प्रकार असावा, असा अंदाज वर्तवला आहे. या प्रकरणाबाबत एका रहिवाशाने सांगितले, “आमच्या सोसायटीत अशा प्रकारच्या घटना आधी कधी घडल्या नव्हत्या. आधीच सोन्याची चोरी झाली आणि आता हा विचित्र प्रकार दिसत आहे. त्यामुळे सर्वजण चिंतेत आहेत.”
दरम्यान, या घटनेमुळे प्रतीक जेम्स सोसायटीत भानुमती, जादूटोणा यांसारख्या अफवांनी जोर धरला आहे. काही जण या घटनेला अंधश्रद्धेचा भाग मानत आहेत, तर काहींच्या मते हा कुणाचातरी लक्ष वेधण्यासाठी केलेला दंगा असू शकतो.
प्रतीक जेम्ससारख्या प्रतिष्ठित आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीत अशा घटना घडू लागल्याने परिसरात भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीनंतर लगेचच जादूटोण्याचा प्रकार समोर आल्याने या घटनांनी एक वेगळाच कलाटणी घेतली आहे. रहिवासी मात्र तपासाच्या निष्कर्षाकडे आणि सुरक्षा व्यवस्थेच्या वाढीव उपायांकडे आता आशेने पाहत आहेत.





