धानसर गावाची परंपरा
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिकेत समाविष्ट धानसर गावाने कात टाकली आहे. गावाचं झापट्याने शहरीकरण होत आहे. असे असताना आजही गावकरी जुन्या प्रथा परंपरा सांभाळण्याचे काम करत आहेत. पूर्वीच्या काळी बळीप्रतिपदेच्या दिवशी गुराढोरांना गावाच्या वेशीवर उधळवण्याची प्रथा ग्रामस्थांनी अद्यापही कायम ठेवली असून, प्रथेप्रमाणे गुराढोरांना सजवून या प्रथेचं पालन केल्याचं पाहायला मिळालं आहे.
एकेकाळी शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या धानसर गावच झपाट्याने शहरीकरण होत आहे. शहरीकरणामुळे गावाचं रुपड पालटल्याने शेती हा व्यवसाय गावातून जवळपास संपुष्टात आला आहे. परिणामी, शेतीकामासाठी पूर्वी जोपसल्या जाणाऱ्या गुराढोरांची संख्या कमी झाली आहे. असे असतानाही गावातील काही शेतकरी अद्यापही शेती टिकवून आपल्या प्रथा परंपरा पाळत आहेत. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जात होती व त्याकरिता जवळपास प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी बैलजोडीसोबत गायी, म्हशी पाळण्याची पद्धत असल्याने दिवाळीदरम्यान येणाऱ्या बलिप्रतिपदा या दिवशी पहाटे लवकर उठून घरातील गुराढोरांना आंघोळ घालून सजवण्याची व गावाच्या वेशीवर गवताच्या गंजिना आग लावून त्यावरून गुरु उडवण्याची प्रथा पाळली जात होती.
विशेषतः ठाणे, रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामीण भागातील गावात साजरी करण्यात येणारी ही प्रथा अनेकांनी शेतीची काम कायमची बंद करून गुरं पाळणे बंद केल्याने कमी झाली असली तरी तालुक्यातील काही गावात आजदेखील काही प्रमाणात ही प्रथा पाळण्यात येत असून पनवेल पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 मधील धांनसर गावातील काही व्यक्तींनी देखील ही परंपरा अद्याप देखील जिवंत ठेवली आहे.
मागील काही वर्षात प्राणी मित्रांकडून या प्रथे वर टीका केली जात आहे. या प्रथे मुळे गुरांना इजा होण्याची शक्यता असल्याचे प्राणी मित्रांचे म्हणणे आहे. मात्र ही प्रथा साजरी करण्यामागे शास्त्रीय कारण आहे. गावाच्या वेशीवर वाळलेल्या गवताचा जाळ करून त्यावरून बैल जाळावरून उडवले जातात. या प्रथेमागे सांगितल्या जाणाऱ्या शास्त्रीय कारणानुसार भातशेतीची चिखलणी व लावणी झाल्यावर पावसाळ्यातील दोन-अडीच महिने बैलांना काही काम नसते. बैल हिरवेगार गवत खाऊन घरातल्या गोठ्यांमध्ये असतात, त्यामुळे त्यांच्या पायांना सतत ओलाव्यामुळे जखमा व रोगराई होते. काम नसल्याने काहीशा सुस्तावलेल्या बैलांना बळीप्रतिपदेला धूर व आगीवरुन उडवले जाण्यामुळे त्यांच्या अंगावर पायांवर असलेले रोग व जीवजंतू नष्ट होतात, तसेच धूर व आग यांच्याशी संपर्क आल्याने बैलांच्या मनात आग व धुराबद्दल असलेली भीती निघून जाते. दिवाळी संपली की लगेच शेतीची मशागत करण्यासाठी बैलांमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण होते. यावेळी प्रत्येक शेतकरीदेखील बैलांच्या पुढे जाऊन स्वतः धुरात आणि आगीवरून जातो आणि त्याच्या मागे आपल्या बैलांना ओढत नेतो दरवर्षी शेतात राब-राब राबणाऱ्या बैलांची ईडा पिडा टाळण्यासाठी पूर्वजांनी सुरू केलेली ढोरं उडवण्याची प्रथा नामशेष होण्याच्या मार्गांवर असली तरी काही गावात आजदेखील ही प्रथा उत्साहात साजरी केली जाते.







