कुटुंबियांनाही मारहाण; आठ जणांविरोधात गुन्हा
| पेण | प्रतिनिधी |
ग्रामसभेत निवेदन देण्यावरून झालेल्या वादाला हिंसक वळण लागून महिलेचा कुर्ता फाडल्याचा तसेच तिला वाचविण्यासाठी आलेल्या कुटुंबियांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा प्रकार पेण तालुक्यातील मळेघर येथे घडला. या प्रकरणी आठ जणांविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ग्रुप ग्रामपंचायत मळेघर येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेला वडगाव, रोडे आणि मळेघर या तीन गावांतील पदाधिकारी व ग्रामस्थ असे सुमारे 70 ते 80 सदस्य उपस्थित होते.
ग्रामसभेदरम्यान आरोपी क्रमांक 1 याने ग्रामसेवकांकडे बंद लिफाफ्यात निवेदन दिले. त्या निवेदनात काय आहे, अशी विचारणा करण्यासाठी तक्रारदार ग्रामसेवकांकडे जात असताना आरोपी क्रमांक 1 याने तक्रारदार महिलेला छातीला हात लावून अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या डाव्या बाजूचा
कुर्ता फाडला. या प्रकारामुळे तक्रारदार महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. तक्रारदार महिलेची मोठी जाऊ भांडण सोडविण्यासाठी आली असता आरोपी क्रमांक 2 याने तिला धक्काबुक्की करून मारहाण केली. यामध्ये तिचा ड्रेस फाटला. त्यानंतर फिर्यादीची सासू, मोठे दीर आणि पती तिला सोडविण्यासाठी मध्ये आले असता आरोपी क्रमांक 2 ते 8 यांनी त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. आरोपी क्रमांक 2 व 6 यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने फिर्यादीच्या पतीच्या डोक्याच्या मागील बाजूस दुखापत झाली. तसेच आरोपी क्रमांक 3 व 4 यांनी फिर्यादीच्या सासूला हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक पोलीस उपनिरीक्षक घोलप तपास करीत आहेत.






