गंभीर जखमी महिलेला हलविण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला पुढील उपचारांसाठी हलविण्याकरिता रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागली. अखेर रात्री साडेनऊच्या सुमारास रुग्णवाहिका पोहोचली; मात्र तोपर्यंत महिलेची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही रात्री साडेदहाच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे श्रीवर्धनमधील आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
9 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास श्रीवर्धन बाजारपेठेत एका दुचाकीची धडक बसल्याने अज्ञात महिला गंभीर जखमी झाली. डोक्याला आणि डाव्या कोपराला दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेल्या महिलेला अर्धवट शुद्धीत श्रीवर्धन येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने टाके घालून प्रथमोपचार केले आणि पोलिसांना एमएलसीबाबत माहिती दिली. डोक्यात अंतर्गत रक्तस्रावाचा संशय असल्याने तसेच प्रकृती गंभीर असल्याने महिलेला सीटी स्कॅन आणि पुढील उपचारांसाठी अन्य रुग्णालयात हलविण्याचे ठरले. मात्र, 108 क्रमांकावर संपर्क साधूनही वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान रुग्णवाहिका मिळण्याची शक्यता असल्याने डॉक्टरांनी रुग्णालयातच पुढील प्राथमिक उपचार सुरू ठेवले.
अखेर रात्री साडेनऊच्या सुमारास रुग्णवाहिका पोहोचली. मात्र, तोपर्यंत महिलेची प्रकृती अत्यंत खालावली होती. ती गॅस्पिंग अवस्थेत गेल्याने डॉक्टरांनी सीपीआर आणि एड्रेनालाईन देत तिला वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र, रात्री साडेदहाच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. गंभीर अवस्थेतील रुग्णाला वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, आपत्कालीन आरोग्यसेवेच्या तत्परतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
अपघातग्रस्त अज्ञात महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने सर्वतोपरी प्रयत्न करूनही उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पुढील उपचारांसाठी उच्चस्तरीय रुग्णालयात हलविण्याकरिता रुग्णवाहिकेची व्यवस्था सज्ज होती; तथापि, प्रकृतीच्या गंभीरतेमुळे त्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली.
डॉ. कौस्तुभ केळस्कर,
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, श्रीवर्धन
