। चणेरा । प्रतिनिधी ।
रोहा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात शनिवारी (दि.28) रात्री एका महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे रोहा शहरात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोराने महिलेच्या चेहऱ्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रोहा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या एका तासाच्या आत संशयित आरोपीला नागोठणे येथून ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या दरम्यान रोहा रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली. एका महिलेवर अचानक धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात महिलेच्या चेहऱ्यावर तसेच हातावर वार करण्यात आल्याने ती गंभीर जखमी झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीचा आढावा घेत जखमी अवस्थेत असलेल्या महिलेला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे दाखल करण्यात आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रोहा पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या एका तासाच्या आत नागोठणे येथून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी अलिबाग येथे रवाना करण्यात आले आहे. मात्र, या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की अन्य कोणत्या कारणातून, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. रेल्वे स्टेशनसारख्या वर्दळीच्या परिसरात रात्रीच्या सुमारास महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या तासाभरात संशयित आरोपीला नागोठणे येथून ताब्यात घेणाऱ्या रोहा पोलिसांच्या तत्परतेची चर्चा होत असली, तरी या हल्ल्यामागील नेमके कारण काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी पुढील तपास रोहा पोलीस करीत असून, तपासातून हल्ल्यामागील कारण आणि घटनेचे अन्य तपशील समोर येण्याची शक्यता आहे.






