। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल-उरण मार्गावरील सर्विस रोडवर बुधवारी (दि.11) सायंकाळच्या सुमारास एका 36 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संगीता सोमनाथ भोईर असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास आर-3/4 जवळील नाल्याजवळ ही घटना घडली. संगीता भोईर या मार्गावरून येत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेचे वैशिष्ट्य म्हणजे जखमी महिलेच्या अंगावर सोन्याचे दागिने होते, या हल्ल्याचा नेमका उद्देश काय होता, याबाबत पोलीस संभ्रमात आहेत. हा प्रकार लुटीच्या उद्देशाने झाला की या मागे काही जुने वैमनस्य आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
भरवस्तीत आणि वर्दळीच्या मार्गावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या पनवेल शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. सदर महिलेला अधिक उपचारार्थ लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तीन वेगवेगळी ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहे.







