रेवस बायपास येथे महिलेला घोड्याने उडविले

महिला जखमी; मोकाट जनावरांमुले नागरिक त्रस्त
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग शहरात मोकाट जनावरांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून अपघाताच्या घटनाही घडू लागल्या आहे. मोकाट सोडलेल्या घोड्याने एका महिलेस हवेत उडविल्याने त्या जखमी झाल्या आहेत. स्वाती पाटोळे (४८) असे जखमी महिलेचे नाव असून त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला जखमा झाल्या आहेत. जखमी स्वाती याना जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सोडून देण्यात आले आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक प्रशासनाकडे केली जात आहे.

अलिबाग शहरातील रेवस बायपास येथे स्वाती पाटोळे ह्या कार्यालयात जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभ्या होत्या. त्याचवेळी घोड्याची एक फौज त्या ठिकाणी आली. स्वाती यांना काही कळायच्या आधीच एक लहान घोड्याने त्यांना उडवले. त्यानंतर मोठ्या घोड्याने पुन्हा जोरात हवेत उडवून रस्त्यावर आपटले. अचानक झालेल्या घोड्याच्या हल्याने स्वाती ह्या रस्त्यावर पडुन बेशुद्ध झाल्या. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्वरित स्वाती याना रिक्षात बसवून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

स्वाती पाटोळे याच्या डोक्याला, चेहऱ्याला जखमा झाल्या असून कमरेला ही मार बसला आहे. डोक्यात जखम झाल्याने टाके मारावे लागले आहेत. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर स्वाती याना सोडण्यात आले आहे. अलिबाग शहरात गुरे, कुत्री, घोडे यांचा सरार्स वावर रस्त्यावर सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. मोकाट जनावरांमुळे नागरिकाच्या जीवाला ही धोका निर्माण होत असून अपघाताच्या घटनाही घडत आहे. मोकाट जनावरांचा काही तरी बंदोबस्त होणे गरजेचे आहे. याबाबत प्रशासनाने पावले उचलण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Exit mobile version