। चिरनेर । प्रतिनिधी ।
गावात दारूबंदीसाठी दारुची दुकाने बंद करण्यात यावी, हळदी, लग्नसमारंभात अनावश्यक खर्च टाळण्यात यासाठी वशेणी गावातील महिलांनी जनजागृती रॅली काढली होती. बुधवारी (17) सरपंच अनामिक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीमध्ये शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. गावातील दारूची दुकाने बंद केली नाहीत तर यापेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा एल्गार दिसून आला.
उरण तालुक्यातील वशेणी गाव परिसरात गावठी दारूची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे. तसेच देशी दारूचेही अनेक दुकाने आहेत. दारुच्या व्यसनात तरुण पिढी अडकत चालली आहे. व्यसनाधीन होत चाललेल्या आबालवृद्ध व तरुणांमुळे अनेक संसार उद्धवस्त होऊ लागले आहेत. गावातील शांतताही लोप पावत चालली आहे. वशेणी गावातील वाढते गावठी दारूचे गुंते, बेकायदेशीर देशी दारूची दुकाने बंद करण्यात यावेत या मागणीसाठी महिलांनी येथील पोलिसांकडे तक्रारीही केल्या आहेत. मात्र, अनेकदा केलेल्या तक्रारींकडे पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले जात असल्याचे महिलांकडून सांगितले जात आहे. तसेच हळदी, लग्नसमारंभात गावभर आहेर म्हणून देण्यासाठी महागड्या साड्या, दारू-मटणावर अतोनात अनाठायी खर्च केला जात असल्याची माहिती वशेणी ग्रामपंचायतीच्या सरपंच अनामिक म्हात्रे यांनी दिली.
लग्न समारंभामध्ये मोठ्या प्रमाणावर वायफळ खर्च करण्यात येतो. कर्जबाजारी होऊन ही उधळपट्टी होत असते. सध्याच्या आधुनिक काळात चुकीची प्रथा बंद करून नवा आदर्श निर्माण करावा यासाठी वशेणी गावच्या सरपंच अनामिक म्हात्रे, प्रज्ञा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी जनजागृती रॅली काढली. वशेणी गाव परिसरात गावठी दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असून, देशी दारूची दुकानेदेखील आहेत. ही सर्व दुकाने तत्काळ बंद करण्याची मागणी महिलांनी केली. वशेणी गावातील दारूची दुकाने बंद करण्याचा ठरावदेखील ग्रामपंचायतीने दिला असल्याची माहिती सरपंच अनामिक म्हात्रे यांनी दिली. जनजागृती करण्याबरोबरच पोलीस अधिकाऱ्यांनी गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी कठोर पावले उचलावीत असे आवाहन करण्यात आले. या रॅलीमध्ये महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. दारूबंदीच्या लढ्याला यश येईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धारही महिलांनी केला आहे.
लग्नसमारंभातील अनावश्यक खर्चा विरोधी उरणमधील महिला रस्त्यावर
