| पनवेल । वार्ताहर |
थर्टी फर्स्टसाठी जवळपासची सर्व हॅाटेल बुक झाल्याने खारघर, तळोजा आणि परिसरातील गावांमध्ये थर्टीफस्ट साजरा करण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यानुसार नियोजनही केले जात आहे. पण अशा ठिकाणांवर पोलिसांकडून वॅाच ठेवण्यात येणार असून नव वर्ष स्वागताच्या उत्साहावर विरजण फिरण्याची शक्यता आहे. निसर्गरम्य म्हणून ओळखल्या जाणार्या खारघर आणि ओवे डोंगरावर डोंगरावर थर्टीफस्ट साजरा करण्याचा अनेकांनी बेत आखला आहे.
खारघरमध्ये अजित पॅलेस बार वगळता बार आणि मद्य विक्रीची दुकाने नाही. पनवेल, सीबीडी परिसरातील हॉटेल, बारमध्ये मद्यप्रेमींची वर्दळ तसेच खाद्य पदार्थांच्या दारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पैसे खर्च करूनही हॉटेलमध्ये मनासारखा आनंद लुटता येत नसल्यामुळे खारघर, तळोजा आणि परिसरातील काही हौशीमंडळी छुप्या मार्गाने निसर्गरम्य अशा खारघर आणि ओवे डोंगरावर डोंगरावर थर्टीफस्ट साजरा करण्याचे बेत आखत आहेत. त्यात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात गारवा निर्माण झाल्याने हा उत्साह दुणावला आहे. पण या ठिकाणांवर जाणे कदाचित महागात पडण्याची शक्यता असून नव वर्ष स्वागताच्या वेळी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
तळीरामांसाठीचे नियोजन सुरू
खारघर परिसरातील गावागावात मोठ्या प्रमाणात अवैधपणे दारू विक्री केली जाते.विशेषतः परिसरातील गावात नाका कामगार, मजूर रंगकाम करणारे भाडेकरू वास्तव्यास असून त्यात तळीरामांची संख्या अधिक आहे. त्यामुळे चढ्या भावाने दारूची विक्री केली जाते. थर्टीफास्टला मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची मागणी होणार आहे. त्यामुळे ही संधी साधून विदेशी मद्यांचाही साठा करण्यात आला आहे.