महाराष्ट्राच्या कबड्डी संघटनेत महिलांचा सहभाग

। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत महिलांच्या सक्रिय सहभागाला संमती देण्यात आली. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या सभेत 25 टक्केपर्यंत सहभागास मंजुरी देण्यात आली.

एक वर्षांपूर्वी झालेल्या घटना दुरुस्तीत महिलांचा सहभाग हा जिल्ह्याच्या मर्जीवर अवलंबून होता. पूर्वी जिल्ह्यातून तीन सदस्य राज्य संघटनेवर पाठविले जात असत पण आता चार सदस्य येतील व त्यात एक महिला सदस्य असणे अनिवार्य करण्यात आले. या घटनेत कार्यकारणी सदस्य वाढविण्यात आले असून त्यात एक महिला सदस्य असणे अनिवार्य करण्यात आले. आता ही कार्यकारिणी समिती 23 सदस्यांची असेल.

यातून स्विकृत सदस्य वगळण्यात आले असून त्यात पाच कार्यकारणी सदस्यांची भर पडली आहे. सल्लागार समिती नव्याने निर्माण करण्यात आली असून त्यात देखील महिला सदस्यांना स्थान देण्यात आले असून त्याच बरोबर स्वीकृत सदस्य, माजी खेळाडू, प्रशिक्षक, वंचित जिल्ह्याचे प्रतिनिधी आदी व्यक्तींना या समितीत स्थान देण्यात येईल. त्याचबरोबर एक उपाध्यक्ष व एक सहकार्यवाह ही पदे वाढवून सात- सात करण्यात आली. या सभेत सदस्यांकडून आलेल्या सुचनांचा योग्य तो विचार करून ही नवीन घटना धर्मादाय कार्यालयात सादर करण्यात येणार आहे. या सभेस सत्तरपेक्षा अधिक सभासद उपस्थित होते.

Exit mobile version