| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर शहरातील सह्याद्री नगर येथील लाकडी फर्निचरच्या वर्कशॉपला मंगळवारी (दि.4)पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागून आगीत वर्कशॉपमधील संपूर्ण फर्निचर व मशिनरी जळून खाक झाली. नगरपंचायत पोलादपूरकडे अग्निशमन यंत्रणा नसल्याने आग विझविण्यासाठी विलंब होऊन लाखो रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले आहे. मात्र अद्याप, आग कशामुळे लागली हे समजून आले नाही.
नगरपंचायत पोलादपूर आणि पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या सह्याद्री नगर येथे राजेश सुतार यांचे लाकडी फर्निचर वर्कशॉप असून, या वर्कशॉपला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलादपूर नगरपंचायतीचे कर्मचारी रुपेश जाधव यांनी नगरपंचायत पोलादपूरकडे अग्निशमन यंत्रणा नसल्याने महाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे गोविंद साळुंखे यांना माहिती दिली. यानंतर महाड नगर परिषदेकडून काही वेळाने अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. यामुळे आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत वर्कशॉपमधील संपूर्ण फर्निचरसह सुतारकामाची मशिनरी व अवजारे जळून खाक झाली. ही आग कशामुळे लागली याबाबत निश्चित कारण समजू शकले नाही.
वर्कशॉपमध्ये घरगुती वापरासाठी संसारोपयोगी फर्निचर राजेश सुतार यांच्याकडून तयार केले जात असे. यामध्ये सोफासेट, दरवाजे, बेड अन्य इतर फर्निचर संपूर्ण जळून खाक झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. राजेश सुतार यांचे उदरनिर्वाहाचे साधन बेचिराख झाले असून स्वयंरोजगारासाठी पुन्हा सज्ज होणे त्यांना कठीण होणार आहे. पोलादपूर पोलिसांना या दुर्घटनेनंतर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला.
पोलादपूर नगरपंचायत येथे सुसज्ज अग्निशमन यंत्रणा नसल्याने अशा आगीच्या घटनांमध्ये महाड औद्योगिक वसाहत आणि नगरपालिका येथील अग्निशमन यंत्रणांना बोलवावे लागत असते. परिणामी, अग्निशमन बंब येण्यास विलंब झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. पोलादपूर नगरपंचायतीने वीस मीटर अंतरावर आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा करणारी छोटेखानी अग्निशमन यंत्रणा घंटागाडीसोबत खरेदी केली होती. मात्र, सदरच्या यंत्रणेचा प्रत्यक्ष घटनेप्रसंगी वापर न झाल्यामुळे यंत्रणा निरुपयोगी होऊन नागरिकांना आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विलंब झाल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
लाकडी फर्निचरचे वर्कशॉप आगीत भस्मसात
