| रसायनी | वार्ताहर |
काही वर्षांपूर्वी देव बसविण्यासाठी लाकडी मंदिर असायचे शिवाय श्रीमंत व्यक्ती सागाच्या किंवा इतर लाकडाचे देवघर बनवित असत. शिवाय जुन्या घरांवर या अगोदर लाकडाच्याच छतावर कौले असायची; परंतु बदलत्या काळात घराचे रुपांतर बंगल्यामध्ये झाल्याने आणि घरामधील असलेल्या देवालय सध्या ग्रेनाईट मार्बलचे झाल्याने लाकडाची मंदिरे वापरण्याकडे नागरिकांचा कल कमी प्रमाणात दिसून येतो.
सद्यस्थितीला जंगलात लागणारे वणवे, लाकूडतोड यामुळे जंगले नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने शिवाय लाकडी मंदिरासाठी लागणारे लाकूड दुर्मिळ होत गेल्याने अनेकांनी मार्बल, ग्रेनाइटने सजवलेली मंदिरे घेण्याला पसंती दिसत असून अशा मंदिराकडे ग्राहकांचा खरेदी करण्याकडे कल दिसत आहे. प्रत्येकांची मानसिकता बदलत चालली आहे. यामुळे नवीन घर बांधले गेले कि त्या जागी सुंदर असा ग्रानाईट-मार्बलचा देवघर बनविण्यासाठी लाकडी मंदिराला कमी मागणी असल्याचे दिसत आहे. मात्र यामुळे ग्रामीण भागात सुताराचे काम करणारे उत्तम कारागीरांवर बेकारीची कुर्हाड आल्याचे दिसून येते. मार्बलचे मंदिर दिसण्यास सुरेख आणि उत्तम कलाकुसरांनी सजलेले असते. तर लाकडी मंदिर आता काळाच्या पडद्याआड होत असल्याने ग्रामीण भागात लाकडावर कोरीव काम करणारे सुतार कामगारांना काम मिळणे मुश्किल झाले आहे. बदलत्या काळात माणूस बदलत गेला देव तेच राहिले; मात्र त्यांचा निवारा बदलत गेला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.