जिल्ह्यात संपाने कामकाज ठप्प; शासकीय कार्यालयात शुकशुकाट

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अनेक मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यामध्ये 15 हजार सरकारी कर्मचार्‍यांसह शिक्षकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे एरव्ही गजबजणार्‍या कार्यालयात मंगळवारी शुकशुकाट पहावयास मिळाला. त्यामुळे जिल्हा मुख्यालय असलेल्या अलिबागमधील शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त आलेल्या अनेकांवर परतीचा मार्ग स्वीकारण्याची वेळ आली.

अलिबागसह रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील महसूल, वन, आरोग्य, शिक्षण, कृषी इत्यादी सर्व विभागांतील राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत, विविध प्राधिकरण, निमसरकारी कर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील परिचारिका व कर्मचारी, सर्व माध्यमिक व प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व चतुर्थ श्रेणी (गट ड) कर्मचारी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायतमधील सर्व कर्मचारी, सफाई कामगार, सर्व शासकीय कार्यालयातील अंशकालीन, रोजंदारी व कंत्राटी कर्मचारी, महिला परिचर विभागातील वाहनचालक अशा 62 विभागांत 15 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.


कृषी, महसूल, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या कामांसाठी अलिबागमधील विविध सरकारी कार्यालयात हजारोंच्या संख्येने नागरिक येत असतात; पण विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कर्मचारी, शिक्षकांनी मंगळवारी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या आंदोलनाचा फटका जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही बसला आहे.

सरकारी कर्मचार्‍यांच्या प्रमुख मागण्या पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमित करावे, रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची पदे निरसित करू नका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजनेचा लाभ द्या, अशा अनेक मागण्या प्रलंबित राहिल्यामुळे कर्मचारी व शिक्षकांमध्ये नाराजी आहे. या मागण्यांसाठी तालुकास्तरावर ठिकठिकाणी रॅली काढण्यात आली होती. यावेळी आंदोलकांनी निदर्शनासह घोषणाबाजी केली.


25 टक्केच शिक्षक सहभागी
रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये सहा हजार 391 शिक्षक व शिक्षण सेवक आहेत. मंगळवारी जिल्ह्यातील दोन हजार 310 शिक्षक व शिक्षण सेवक संपात सहभागी झाले होते. त्यामुळे शिक्षकांचा संपात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. फक्त 25 टक्के शिक्षक संपात सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले. अलिबाग तालुक्यातील काही शाळा सुरु होत्या; परंतु तालुक्यातील काही शाळा शंभर टक्के बंद होत्या. मात्र, तरीदेखील काही शाळांमध्ये एकाच शिक्षकांच्या भरोवशावर विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करण्यात आले.

गैरसोय होऊ नये यासाठी नायब तहसीलदार, कोतवाल, प्रशिक्षणार्थी तहसीलदार उपलब्ध आहेत. त्यांच्यामार्फत नागरिकांचे प्रश्‍न सोडवले जात आहेत. वेगवेगळे दाखले, अ‍ॅफिडेव्हिटची कामे या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या मदतीने केली जात आहेत.

विक्रम पाटील, तहसीलदार

आरोग्य सेवेतील कर्मचारीदेखील मोठ्या संख्येने संपात सहभागी झाले आहेत. मात्र, त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये यासाठी हजर असलेल्या कर्मचार्‍यांची बैठक घेऊन त्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

डॉ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय

नेहमीप्रमाणे सर्व विभागातील कार्यालये सुरू होती. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सर्व कार्यालयांमध्ये पुरेसे कर्मचारी उपस्थित असून, कामकाजावर परिणाम झालेला नाही. जे अधिकारी रजेवर आहेत, त्यांना कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी,
रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version