। श्रीवर्धन । संतोष चौकर ।
सन 2012 ते 13 च्या दरम्यान बहुचर्चित अशा कोकणातून जाणार्या सागरी महामार्गावरील बागमांडला ते बाणकोट या पुलाच्या कामाचे उद्घाटन तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आले होते. त्यावेळी राज्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेमध्ये होते. छगन भुजबळ महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री हरेश्वर, बागमंडला या ठिकाणी येणार म्हणून भर पावसामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरती डांबर टाकण्याचा प्रताप केला होता. रस्ता ओला असताना देखील त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, नंतर झालेल्या जोरदार पावसामुळे तो रस्ता पूर्णपणे उखडून गेला होता.
सुरुवातीला या पुलाच्या बांधकामाची रक्कम अंदाजे 182 कोटी रुपये ठरविण्यात आली होती. परंतु, त्यानंतर या खाडीमधून मोठी जहाजे जातील, या कारणाने पुलाची उंची वाढवून जवळजवळ साडेचारशे कोटी रुपयांची तरतूद या बांधकामासाठी करण्यात आली होती. वास्तविक पाहता मोठी जहाजे जातील, एवढी बाणकोट खाडीची लांबी, रुंदी व खोलीसुध्दा नाही. त्यासाठी खाडीमार्गातून जाणारे पुलाचे पिल्लर खुप उंचीचे बांधण्यात आले होते. मात्र, आजमितीस सर्व बांधलेले पिल्लर तयार असूनही पुलाचे काम अपूर्ण सोडून नव्याने पूल बांधण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नवीन कामाची निविदा काढली आहे. ठेकेदाराने पुलाचे काम सुरू केले आहे. 2012 ते 13 च्या दरम्यान सुरू झालेले हे पुलाचे काम 2015 पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. जर 2015 साली या पुलाचे काम पूर्ण झाले असते तर, रायगड व रत्नागिरी जिल्हे एकमेकांना जोडले जाऊन या ठिकाणी पर्यटन व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावरती बहरला असता. परंतु, राजकीय अनास्थेमुळे या पुलाचे बांधकाम अनेक वर्षांपासून रखडले. आता नव्याने होत असलेले पुलाचेदेखील चौपदरीकरण करणे आवश्यक आहे.
या मार्गावरून खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाटमाथ्यावरून कोकणामध्ये येणार्या पर्यटकांना गणपतीपुळेकडून श्रीवर्धन, हरिहरेश्वरकडे येण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. तसेच, पुण्यातून श्रीवर्धन येथे येणार्या पर्यटकांना गणपतीपुळे किंवा रत्नागिरी या ठिकाणी जाण्यासाठी देखील हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. नव्याने सुरू झालेले काम शासनाने लवकरात लवकर पूर्ण झाल्यास या ठिकाणच्या पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. त्यामुळे हे काम तातडीने पुर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.