ठेकेदार मालामाल, दिव्यांगांचे हाल
| अलिबाग | प्रमोद जाधव |
मूकबधीर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून अद्ययावत इमारत बांधण्याचा गाजावाजा जिल्हा परिषदेने केला. मात्र, भूमीपूजन होऊन चार वर्षे होत आहेत. परंतु, अजूनपर्यंत या विद्यालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले नाही. ठेकेदार मालामाल आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचे हाल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे. विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करणारे ठेकेदार बांधकाम अधिकारी यांच्या अगदी जवळचे असतानाही इमारतीचे काम होण्यास विलंब का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता त्यांच्या दुर्लक्षपणाचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बसत आहे.
जीर्ण झालेल्या मूकबधीर विद्यालयाच्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून दोन कोटी 46 लाख 92 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. 15 ऑगस्ट 2021 मध्ये तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या इमारतीच्या कामाचे भूमीपूजन भरपावसात करण्यात आले. मूकबधीर विद्यालयाची इमारत वर्षभरात पूर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु, ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे हे काम संथगतीने सुरु राहिले. भूमीपूजन होऊनदेखील कित्येक महिने साधे खोदकामही ठेकेदाराने केले नसल्याचे बोलले जात आहे. ‘कृषीवल’ने याबाबत आवाज उठविल्यानंतर ठेकेदाराने कामाला सुरुवात केली. ‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे ठेकेदाराचा कारभार चालला. त्यानंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अडीच कोटींपैकी सुमारे 87 लाख रुपये ठेकेदाराला मिळाल्याची चर्चा आहे. परंतु, कामामध्ये प्रगती नसल्याचे दिसून आले आहे. भूमीपूजन होऊन चार वर्षे होण्याच्या वाटेवर आहेत. तरीदेखील या इमारतीच्या कामात प्रगती नसल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत.
इमारत निविदाच्या विळख्यात
मूकबधीर विद्यालयाचे काम आता दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात आले आहे. कामाची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे निविदाच्या विळख्यात मूकबधीर विद्यालयाची इमारत सापडली आहे. मूकबधीर विद्यालयाचे काम वेळेवर पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांना भाड्याच्या खोलीमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे हा त्रास विद्यार्थ्यांना होत आहे.
पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम केले जाणार आहे. निविदा प्रक्रिया काढण्याचे काम सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नव्याने कामाला सुरुवात होणार आहे. याबाबत अधिक माहिती उपअभियंता यांच्याकडे आहे.
राहुल देवांग,
कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम
