जलजीवन मिशनचे काम रेंगाळले

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील खांदन गावातील महिलांना आजही विहिरीवर जाऊन पाणी आणावे लागते. त्यामुळे हर घर जल ही जलजीवन मिशनचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी बाहेर जावे लागत आहे. दुसरीकडे याच गावात जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहिली आहे.

कशेळे जामरुख रस्त्यावर पिंगळस गावच्या अलीकडे खांदन गाव आहे. या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे. अंगणवाडी इमारत आहे आणि आता येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहिले आहे. अशा 250 लोकवस्तीच्या गावासाठी जलजीवन मिशन मधून राबवण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे पाणी गावात पोहचले नाही आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. येथील महिलांना गावच्या बाहेर असलेल्या विहिरीवर पिण्याचे पाणी आणण्यासाठी जावे लागत असून डांबरी रस्त्याच्या बाजूने या महिला वाहनाची वर्दळ असताना जीव धोक्यात घालून पिण्याचे पाणी डोक्यावर हांडे भरून घेऊन येतात. जलजीवन मिशनचे काम रेंगाळले आहे आणि त्यामुळे येथील नळपाणी योजनेचे देखील तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे महिलांवर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.

या गावाचे हद्दीत आता रायगड जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचा प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहत आहे. कशेळे येथे ग्रामीण रुग्णालय झाल्याने कशेळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आंबिवली येथे हलवण्यात आले. मात्र 20 वर्षात आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्राला हक्काची इमारत मिळाली नाही त्यामुळे आजही लहानशा खोलीमध्ये आंबिवली येथे ही प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. या इमारतीचे उद्घाटन बाकी असून या इमारतीतून काही दिवसांनी किंवा महिन्यांनी कारभार सुरू होणार आहे. मात्र त्या दवाखान्यात राहणारे कर्मचारी, दवाखान्यात उपचार घेण्यासाठी येणारे रुग्णांना पिण्याच्या तसेच वापरासाठी पाण्याची अडचणी यांना सामोरे जावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन जलजीवन मिशनमधून नळपाणी योजना राबवण्याची गरज आहे. नियोजित ठिकाणी सुरू होणारे आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खांदन गावातील ग्रामस्थ यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्र निकाली निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी तेथील महिलांची रस्त्यांचे हांडे भरून पाणी नेण्याची कसरत थांबणार का? असा प्रश्न कायम आहे.

Exit mobile version