गणेशोत्सवापूर्वी एक लेन सुरू होणार?; पूर्ण मार्ग 15 सप्टेंबरनंतर खुला होण्याची शक्यता
| माणगाव | प्रतिनिधी |
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या लाखो चाकरमान्यांना यंदा काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. माणगाव-इंदापूर बायपासची किमान एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुली करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून, कळमजे नदीजवळील गार्डरचे काम पूर्ण झाल्यानंतर 21 दिवसांचा आवश्यक कालावधी पूर्ण करून 15 सप्टेंबरनंतर कळमजे ते पुढील बायपास मार्ग खुला होऊ शकतो, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
माणगाव शासकीय विश्रामगृहात शनिवार, 8 ऑगस्ट रोजी खासदार सुनील तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी, अपघातप्रवण ठिकाणे, पर्यायी मार्ग आणि रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
माणगाव-निजामपूर पुलापासून बायपासची एक मार्गिका सुरू करण्याचे नियोजन असून, ती सुरू झाल्यास गणेशोत्सव काळात माणगाव शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. मुगवली बायपासवरील वाहतूक नियोजन आणि बेरीकेडिंग योग्य पद्धतीने करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच साईराम हॉटेल, निजामपूर रोड ते मुगवली फाटा हा पर्यायी मार्ग गणेशोत्सवात वापरण्याबाबतही चर्चा झाली. दरम्यान, ताम्हिणी घाटातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सुमारे 10 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडण्यात आला असून, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. सुकेळी टोलनाका सध्या सुरू होणार नसल्याचे स्पष्ट करताना, खारपाडा-इंदापूर मार्गाचे काम पूर्ण क्षमतेने झालेले नसताना टोल आकारण्यासही विरोध करण्यात आला.
महामार्गावरील सर्व्हिस रोडचा अभाव, अपघातप्रवण ठिकाणे, खड्डे आणि वाहतूक सुरक्षेबाबतही बैठकीत चर्चा झाली. गणेशोत्सवाच्या काळात मोर्बा रोडसह उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. महामार्गाच्या कडेला वाहने उभी करू नयेत, असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी नागरिक व व्यापाऱ्यांना केले.
पेव्हर ब्लॉकवरुन नाराजी व्यक्त
नागोठणे, सुकेळी, कोलाड आणि माणगाव परिसरातील महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात येणारे पेव्हर ब्लॉक काही दिवसांतच उखडून रस्ता पुन्हा खराब होत असल्याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. महामार्गावर पेव्हर ब्लॉकचा वापर तातडीने थांबवून आधुनिक तंत्रज्ञान आणि टिकाऊ साहित्याचा वापर करून खड्डे बुजवावेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासन व संबंधित कंत्राटदारांना दिल्या.
माणगाव-निजामपूर पुलापासून बायपासची एक मार्गिका सुरू करण्याचे नियोजन असून, ती सुरू झाल्यास गणेशोत्सव काळात माणगाव शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. मुगवली बायपासवरील वाहतूक नियोजन आणि बेरीकेडिंग योग्य पद्धतीने करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
खा. सुनील तटकरे
